मंडळी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामुग्रीवर भरघोस अनुदान दिलं जात आहे. ही योजना शेती सुलभ, कार्यक्षम आणि अधिक उत्पादनक्षम करण्याच्या दृष्टीने राबवली जाते. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी एकूण 204.14 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा 122.48 कोटी आणि राज्य शासनाचा हिस्सा 81.65 कोटी आहे.
या योजनेअंतर्गत पावर ट्रीलर, स्वयंचलित शेती अवजारे, ट्रॅक्टरसाठी पूरक अवजारे, मनुष्य व पशु चालित यंत्र, हार्वेस्टर मशीन, तसेच महिलांसाठी मल्टी टूल कॅरिअर अशा विविध यंत्रसामग्रीवर अनुदान दिलं जातं. या योजनेद्वारे एकूण 416 अवजार बँका स्थापन करण्यात येणार असून त्या सामायिक वापरासाठी उपलब्ध असतील.
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाचे प्रमाण त्याच्या सामाजिक व आर्थिक वर्गवारीनुसार ठरवण्यात आलं आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा कमाल 1 लाख 25 हजार रुपये इतके अनुदान मिळू शकते. इतर सर्व शेतकऱ्यांसाठी 40 टक्के किंवा कमाल 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते.
या योजनेत ट्रॅक्टर खरेदीसाठी थेट अनुदान दिलं जात नाही, मात्र ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या अवजारांवर अनुदान दिलं जातं. इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी लागते. अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा केलं जाईल.
या योजनेंतर्गत महिलांसाठी विशेष प्रावधान करण्यात आले असून त्यासाठी नमो ड्रोन निधी अंतर्गत मल्टी टूल कॅरिअर उपघटक राबवण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून 645 महिला लाभार्थींना त्याचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी ही संधी नक्कीच वापरावी आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेती अधिक फायदेशीर बनवावी.