क्रिकेट वर निबंध मराठी | Cricket Essay in Marathi

Cricket Essay in Marathi : आपला भारत देश “क्रिकेटची पंढरी” म्हणून जगात सर्वत्र ओळखला जातो. मनोरंजन या हेतूने खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमधून आपल्या शरीराचा सर्वांगीण व्यायाम होत असतो. १८ व्या शतकात इंग्रजांनी हा खेळ भारतात आणला, आणि आज संपूर्ण देश क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून ओळखला जाऊ लागला.

क्रिकेटला “द जंटलमन्स गेम” म्हणून ओळखले जाते. क्रिकेट हा एक सांघिक खेळ असल्याने व्यायाम व मनोरंजनाबरोबरच नेतृत्व, सांघिक विचार यांसारख्या कौशल्यांचा विकास होतो.

क्रिकेट वर निबंध मराठी । Cricket Essay in Marathi

क्रिकेट निबंध मराठी Cricket Essay in Marathi

क्रिकेट वर निबंध मराठी | Cricket Essay in Marathi (१०० शब्दांत)

क्रिकेट हा सांघिक खेळ असून प्रत्येकी अकरा खेळाडू असणाऱ्या दोन संघादरम्यान खेळला जातो. क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू, बॅट, यष्टी, २२ यार्डची खेळपट्टी आणि मैदानाची आवश्यकता असते. साधारणपणे मैदानाच्या मध्यभागी २२ यार्डची मुख्य खेळपट्टी बनविलेली असते तिच्या दोन्ही बाजुंना प्रत्येकी तीन यष्ट्या उभ्या केलेल्या असतात. क्रिकेट हा खेळ प्रामुख्याने एकदिवसीय, ट्वेन्टी-ट्वेन्टी आणि कसोटी अशा तीन प्रकारांमध्ये खेळला जातो.

 एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघांना प्रत्येकी पन्नास षटकांची मर्यादा असते तर टी-ट्वेन्टी सामन्यासाठी ही मर्यादा वीस षटकांची असते. कसोटी हा काहीसा वेगळा क्रिकेट प्रकार असून दोन्ही संघांच्या संयमाची, खेळ तंत्राची परीक्षा घेत असतो. यामध्ये प्रत्येक संघ दोनदा फलंदाजी करू शकतो. काही देशांमध्ये दहा षटकांचे सामने खेळविण्यास अलीकडच्या काळात सुरुवात झाली आहे.हा क्रिकेट प्रकार देखील टी-ट्वेन्टी प्रमाणे रोमांचित करणारा असून निर्णय तत्परता या मानवी कौशल्याची परीक्षा घेत असतो.

क्रिकेट वर निबंध मराठी | Cricket Essay in Marathi (२०० शब्दांत)

नाणेफेक झाल्यानंतर एक संघ फलंदाजीसाठी तर दुसरा संघ गोलंदाजीसाठी मैदानात उतरतो. निर्धारित षटक पूर्ण झाल्यानंतर किंवा फलंदाजी करणारा संघ सर्वबाद झाल्यानंतर ही भूमिका बदलली जाते. सामना सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम मैदानात दोन पंच आणि गोलंदाजी करणाऱ्या संघातील अकरा खेळाडू मैदानात उतरतात. यानंतर फलंदाजी करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघातील दोन फलंदाज, फलंदाजीसाठी मैदानात उतरतात.

गोलंदाजी करणाऱ्या संघाचे मुख्य उद्धिष्ट फलंदाजी करणाऱ्या संघाला कमीत कमी धावांत सर्वबाद करणे असते. तर फलंदाजी करणारा संघ निर्धारित षटकांत अधिका-अधिक धावा करण्याचा प्रयत्न करत असतो. ह्यासाठी प्रत्येक संघ एका ठराविक व्यूहरचनेसह मैदानात उतरत असतो. ह्या व्यूहरचनेमध्ये फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि ऑलराउंडर ह्यांचा समावेश असतो. सामना खेळत असताना दोन्ही संघांना काही अटी व नियमांचा विचार करावा लागतो. यामध्ये गोलदाजासाठी कमाल षटक संख्या, अतिरिक्त धावा, लेगबाय, व्हाईड यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

मैदानातील दोन्ही पंच ज्यावेळी योग्य निर्णय देऊ शकत नाहीत अशावेळी तिसऱ्या पंचांचा आधार घेतला जातो. जर पंचांचा निर्णय अयोग्य वाटत असेल तर दोन्हीही संघ ठराविक संख्येत तिसऱ्या पंचांकडे अपील करू शकतात. संथ गतीने षटके टाकल्यास संबंधित संघाच्या कर्णधारास आर्थिक स्वरूपात दंड भरावा लागतो. अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. कारण सामन्याचा निकाल हा सांघिक कामगिरिसह आद्रता, खेळपट्टीचा प्रकार, तापमान, ऋतू, पाऊस यांसारख्या नैसर्गिक बाबींनी प्रभावित होत असतो.

क्रिकेट वर निबंध मराठी | Cricket Essay in Marathi (३०० शब्दांत)

आयसीसी ही क्रिकेटमधील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्था असून, जागतिक स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करत असते. तसेच “बीसीसीआय” ही संस्था भारतीय क्रिकेट विषयीच्या सर्व घटकांचे जसे की वार्षिक सामन्यांची संख्या, खेळाडूंचे मानधन, आयपीएल, इत्यादी गोष्टींचे नियोजन करत असते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत वर्षभर विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन केले जाते. यामध्ये विश्वचषक, आयपीएल, निदहास ट्रॉफी, चॅम्पियन ट्रॉफी, आशिया कप, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, बायलॅटरल सिरीज अशा अनेक स्पर्धांचा समावेश होतो.  भारतीय संघाने १९८३ मध्ये कपिल देव तर २०११ मध्ये महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर २००७ साली महेंद्र सिंग धोनी ह्यांच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघाने पहिलाच टी-ट्वेन्टी विश्वचषक जिंकून इतिहास रचला. ह्या विश्वचषकामध्ये युवा खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय होती, त्यातूनच पुढे भारतीय क्रिकेट विश्वाला रोहित शर्मा सारखे प्रतिभावंत खेळाडू मिळाले.

रणजी, देवधर ट्रॉफी, आयपीएल यासारख्या स्पर्धा युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्यासाठी मंच उभा करून देत आहे. एकेकाळी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज, आस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचा विशेष दबदबा होता, मात्र सध्या भारतीय संघ जगातील अववल संघ म्हणून ओळखला जातो. भारतीय क्रिकेटची भरभराट होण्यामध्ये सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग, जहीर खान, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण, हरभजन सिंग, रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना यासारख्या असंख्य खेळाडूंचे मोलाचे योगदान आहे.

  मैदानी खेळ म्हटलं की सध्या आपल्या देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रिकेटचं बघायला मिळत. याच मुख्य कारण म्हणजे बीसीसीआयने केलेले उत्कृष्ट नियोजन ! आजच्या घडीला आपल्या देशातील प्रत्येक राज्यात एक ते दोन मोठं-मोठी मैदाने निर्माण करण्यात आली आहे. यामुळे खेळासह आर्थिक विकासाला देखील चालना मिळते आहे. क्रिकेटचे समाजजीवनावर काही दुष्परिणाम सुद्धा बघावयास मिळत आहेत. युवा, तरुण क्रिकेटचे सामने बघण्यात तासंतास वाया घालवतात. कसोटी क्रिकेट प्रतिदिवशी साधारणपणे आठ तास खेळले जाते, यामुळे काही क्रिकेटवेडे तरुण आपले काम सोडून आठ तास फक्त मनोरंजनात घालवतात. तसेच काम करतांना सामने बघत असल्यास कामाची गुणवत्ता देखील ढासळते.

Leave a Comment