Kolhapur Information In Marathi नमस्कार मित्रांनो,कोल्हापूर शहराचे नाव घेतले की दोन गोष्टी प्रामुख्याने नजरेसमोर येतात.त्यापैकी एक महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजेच कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसरे छत्रपती राजश्री शाहू महाराज भोसले. याच कोल्हापूर जिल्ह्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण माहिती Kolhapur Information In Marathi
समुद्रसपाटीपासून या शहराची उंची 569 मीटर म्हणजेच 1567 फूट इतकी आहे.कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यावर आहे. पंचगंगेच्या काठी वसलेला कोल्हापूर जिल्हा! शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा! मातीत घडून गेलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा आजही पाहायला मिळतात तो कोल्हापूर जिल्हा!
कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आणि सह्याद्री पर्वत रांगा सभोवताली आहेत. हे ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि पूर्व रॉयल्सच्या राजेशाही ठिकाणांसाठी प्रसिद्ध शहर आहे. भारताची वैभवता आणि भव्यता शोधण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
कोल्हापूर हे भारताच्या आर्थिक राजधानी मुंबई पासून सुमारे 387 कि.मी. अंतरावर आहे आणि भारतीय हस्तकलेच्या चमड्यांचे चप्पल, कोल्हापुरी चप्पल आणि तिच्या खासगी स्थानिक दागिन्यांसाठी विशेष प्रसिद्ध हार कोल्हापुरी साज नावाचे आहे.
कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंदिरसाठी प्रसिद्ध आहे.कोल्हापुर त्याच्या रांगडेपणामुळे, खवय्येगिरीने, कुस्तीमुळे, पेहेरावावरून, परंपरांमुळे, ऐतिहासिक वास्तुंमुळे प्रसिध्द आहे.
आपुलकीच्या भाषेमुळे, प्रेमळ माणसांमुळे सुध्दा कोल्हापुर ओळखले जाते.छत्रपती शाहु महाराजांच्या काळात (1874- 1922) या जिल्हयाचा मोठया प्रमाणात कायापालट झाला.
कोल्हापूर नावाची उत्पत्ती
एका आख्यायिकेनुसार कोल्हासुर नावाच्या राक्षसामुळे येथील लोक फार त्रस्त झाले होते, त्याच्या अराजकतेला कंटाळुन देवतांनी देवीला विनंती केली त्यामुळे देवी महालक्ष्मीने त्या कोल्हासुरा सोबत युध्द केले.
हे युध्द नऊ दिवस चालले त्यानंतर अश्विन शुध्द पंचमीला देवी महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला त्यावेळी त्याने देवीला विनंती केली की या नगरीचे नाव कोल्हापुर आणि करवीर अशी आहेत ती यानंतरही न बदलता अशीच राहु दयावी.
देवीने त्याची विनंती मान्य केली आणि आजही हे शहर कोल्हापुर आणि करविर या नावाने ओळखले जाते.हे शहर इतिहासात घडुन गेलेल्या अनेक घटनांचे साक्षीदार आहे.
इतिहास
इ.स.पूर्व १ ल्या शतकापासून ते इ.स.च्या ९ व्या शतकापर्यतच्या ऐतिहासिक कालखंडात कोल्हापूर येथील वसाहत आजच्या ब्रह्यपुरीच्या टेकडीवर होती. ब्रह्यपुरीच्या टेकडातील अवशेषांचे अन्वेषण व उत्खनन असे दर्शविते की, सातवाहन काळात या परिसरात समृद्ध व सुसंस्कृत लोकसमुदाय वस्ती करून रहात होता.
इ.स. २२५ ते ५५०पर्यत वाकाटक, कदंब, शेद्रक व मौर्य या प्राचीन राजघराण्यांचे राज्य होते. इ.स.५५० ते ७५३ या कालखंडात बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता येथे प्रभावी होती. इ.स.च्या १२ व्या शतकात कोल्हापुरात शिलाहारांचे राज्य होते.
इ.स.१२१० मध्ये देवगिरीचा राजा सिंघणदेव याने कोल्हापुराच्या शिलाहार सम्राट भोजराजाचा पराभव केला. त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या एका प्रांताची राजधानी म्हणून कोल्हापूर अग्रेसर राहिले .१२९८ मध्ये देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर १३०६-१३०७मध्ये कोल्हापूर शहरात मुसलमानी सत्तेचा अंमल सुरू झाला. कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखले जाते.
मराठा साम्राज्य
देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मुलुख स्वराज्यात समाविष्ट करेपर्यंत कोल्हापूर पारतंत्र्यातच होते.
शिवाजी महाराजांनी अफझलखानच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळा हा किल्ला घेतला आणि कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्यात समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांच्या काळातील अनेक ऐतिहासिक घटनांचे कोल्हापूर हे साक्षीदार आहेत.
कोल्हापूर संस्थान
शिवछत्रपतींच्या मराठा राज्याची इसवी सन १७०७ साली दोन तुकडे झाले . कोल्हापूर आणि सातारा या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. त्या पैकी कोल्हापूर संस्थानच्या अधिपती ह्या महाराणी ताराराणी बनल्या.
पुढे जरी संपूर्ण भारत देशाबरोबर कोल्हापूर संस्थान जरी ब्रिटिश अधिपत्याखाली आले असले तरी कोल्हापूर संस्थानच्या अधिकारांना धक्का लागला नाही. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोल्हापूर संस्थान देखील स्वतंत्र भारतात विलीन झाले.
भूगोल
कोल्हापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला, पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेले शहर असून ते मुंबईपासून ३७६ किमी, पुण्यापासून २३२ किमी, गोव्यापासून २२८ किमी आणि बंगलोरपासून ६६५ किमी अंतरावर आहे. कोल्हापूर सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्यावर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मी. (१८६७ फूट) इतकी आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ इथून जातो.
कोल्हापूरला उत्तरेला सांगली जिल्हा, आग्नेयेकडून कर्नाटकचे जिल्हे, आग्नेयेला बेलागावी जिल्हा आणि दक्षिणेस विजयपूर जिल्हा, नैत्येस सिंधुदुर्ग जिल्हा आणि वायव्येस रत्नागिरी जिल्हा आहे.
पंचगंगा नदी हे या शहराचे मुख्य नदी आहे . या नदीचा उगम पश्चिम घाटातून होतो .या नदीला भोगावती ,कुंभी, कासारी, तुळशी ,अशा पाच उपनद्या येऊन मिळतात. कोल्हापूर शहराची जुनी ओळख म्हणजे या शहराला तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.
कारण फिरंगाई ,कपिलतीर्थ ,लक्षतीर्थ, कुंभारतळे ,महारतळे, सिद्धाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर इत्यादी तलाव या शहरात होते. शहराच्या वाढीबरोबर आणि काळाच्या ओघात बरेच तलाव नष्ट झाले . प्रसिद्ध रंकाळा तलाव प्रामुख्याने कोल्हापूर शहरात पाहायला मिळतो.
भूवर्णन : गगनबावडा तालुक्यातील तळकोकणात मोडणारी ३९ गावे सोडली, तर हा सर्व जिल्हा दख्खन पठाराच्या पश्चिम भागात सु. ३९० ते ५५० मी. उंचीवर आहे. जास्तीत जास्त उंची ९०० मी. पर्यंत आहे. सह्याद्रीची मुख्य रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर गेलेली असून तिचा एक प्रमुख फाटा उत्तर भागात पूर्वेस गेलेला आहे.
इतर फाटे लहान असून नैर्ऋत्य-ईशान्य गेलेले आहेत. जिल्ह्याचा पूर्वभाग त्या मानाने सखल व सपाट आहे. या जिल्ह्यातून कोकणात उतरण्याच्या अनेक वाटा आहेत त्यांपैकी आंबा, फोंडा व आंबोली हे घाट प्रमुख आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र बेसाल्ट हा अग्निजन्य खडक आढळतो. चंदगड, राधानगरी वगैरे काही भागांत मात्र कुरुंदाचा दगड मिळतो. शाहूवाडी, पन्हाळा व आजरा या तालुक्यांत बॉक्साइटाचे मोठे साठे आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र येथे निघणाऱ्या ॲल्युमिनियमच्या कारखान्यांस त्यांचा पुरवठा होईल. भुदरगड तालुक्यात जिप्सम सापडते.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके व गावे
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासकीय विभाग 12 तालुके आहेत ज्याला तहसील म्हणतात, हे 12 सेहवाडी, पन्हाळा, समन, शिरोळ, करवीर, गगनबावडा, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड आहेत आणि जिल्ह्यात 5 उपविभाग भुदरगाडा, राधानगरी आहे. करवीर, इचलकरंजी आणि पन्हाळा.
कोल्हापूर जिल्ह्यात अशी काही गावे आहेत जी ग्रामपंचायती अंतर्गत येतात. परंतु कोणत्याही अधिकृत स्रोताकडून माहिती नसल्यामुळे आम्ही प्रकाशित करू शकत नाही.
लोकसंख्या
जिल्ह्याची लोकसंख्या १९६१ ते १९७१ या दशकात १५,९६,४९३ वरून २०,४८,०४९ वर गेली म्हणजे तिच्यात २८% वाढ झाली. २१·५% लोक शहरांत व ७८·५% लोक खेड्यांतून राहतात. जिल्ह्यात शहरे व मोठी गावे १९ आहेत, तर खेडी १,०७८ आहेत. यांपैकी ४४% गावांत वीज आलेली आहे.
स्त्रियांचे पुरुषांशी प्रमाण हजारी ९६१ असून लोकवस्तीची घनता दर चौ. किमी.स. २५४ आहे. करवीर, हातकणंगले, शिरोळ या भागांत ती जास्त तर गगनबावडा, चंदगड, शाहूवाडी या भागात ती कमी आहे. साक्षरता ३५% असून पुरुषांत ती ५०% तर स्त्रियांत फक्त २०% आहे.
हवामान
कोल्हापूरचे हवामान किनारपट्टी आणि देशावरील हवामानांचा संयोग आहे. कोल्हापूरच्या हवामानात सागरी हवामान आणि जमिनीवरील हवामान यांचे मिश्रण आहे. शेजारील शहरांच्या तुलनेत कोल्हापूर मधील उन्हाळा तुलनेने सोम्य आहे परंतु हवामान जास्त दमट असते .
वर्षभरातील तापमान १२°से. ते ३५°से. या दरम्यान असते.कोल्हापुरातील उन्हाळा शेजारच्या इतर शहरांच्या तुलनेत थंड पण जास्त दमट असतो. उन्हाळ्यातील कमाल तापमान सहसा ३८° से.च्या वर जात नाही. किमान तापमान २४° से. ते २६° से. पर्यंत असते.
तापमान कमी असूनही आर्द्रतेमुळे हवा दमट आणि चिकट असते. कोल्हापूर पश्चिम घाटाजवळ असल्याने जून ते सप्टेंबरच्या दरम्यान भरपूर पाऊस पडतो. यामुळे शहराच्या सखल भागात काही दिवस पाणी शिरून पूर येतो. पावसाळ्यात तापमान २३° से. ते ३०° से.च्या दरम्यान असते. कोल्हापुरातील हिवाळा कडाक्याचा नसतो. हिवाळा साधारणता नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो इतर शहरांच्या मानाने कोल्हापूरचे तापमान हिवाळ्यात बरेच उबदार असते .
किमान तापमान १४° से. ते १६° से. तर कमाल तापमान २९° से. ते ३२° से. पर्यंत असते. याकाळात दमटपणा कमी असल्याने हवामान उल्हासदायी असते. शाहूवाडी या तालुक्यात 200 सें. मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो. गगनबावडा येथे तो 700 सें.मी.पेक्षाही जास्त पडतो. भुदरगड व पन्हाळा या तालुक्यात 120 सें.मि. ते 200 सें.मी.पर्यंत वाढते तर कागल तालुक्यात तो 65 सेंटीमीटर ते 95 सेंटीमीटर पडतो. हातकणंगले तालुक्यात मात्र पेक्षा 65 सें. मी.पेक्षा कमी पाऊस पडतो.
भाषा
बहुसंख्य लोकांची भाषा मराठी असून काही लोक कानडी व काही उर्दू बोलतात. महाराष्ट्र हे एक असे राज्य आहे की जेथे सर्व प्रकारच्या भाषा बोलल्या
जातात कारण महाराष्ट्र मध्ये सर्व प्रकारचे जातीचे, धर्माचे लोक राहत असल्यामुळे तेथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.
आहार
लोकांचे मुख्य अन्न जोंधळा व नाचणी, त्याच्या जोडीला भाजी, कांदा, आमटी, परवडेल तेव्हा भात, मांस व मासे असे परंतु झणझणीत असते.
पोशाख
कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांची राहणी मराठमोळा पद्धतीची आहे. धोतर, कुडते, मुंडासे व वहाणा आणि खांद्यावर कांबळे हा सर्वसाधारण खेडुतांचा वेश असतो, तर लुगडे व चोळी हा स्त्रियांचा वेश असतो.
अलीकडे शहरी संपर्काने यात बराच फरक पडत आहे. तथापि कोल्हापूरी फेटा, कोल्हापूरी वहाणा, कोल्हापूरी रगेल व रंगेल भाषा यांचा प्रभाव जाणवतो. येथील सर्वसामान्य स्त्रिया प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापदे– गेलो, जातो– अशी वापरताना आढळतात.
शेती
शेती हा जिल्ह्याचा मुख्य व्यवसाय असून एकूण कामकरी लोकांपैकी ७१·४०% लोक शेतावर काम करतात. जिल्ह्यातील एकूण जमिनीपैकी सु. ६७% जमीन शेतीसाठी उपलब्ध आहे. तीपैकी ७४·३% जमीन १९६९-७० मध्ये प्रत्यक्ष लागवडीखाली होती. प्रत्यक्ष्ा लागवडीखालील जमिनीपैकी ५२.४% अन्नधान्यांखाली, १०% उसाखाली, १३·५% भुईमुगाखाली व फक्त २१ हे. म्हणजे ०·१३% जमीन कापसाखाली होती.
पिकाखालील जमिनीपैकी ७·८९% जमीन ओलीताखाली होती. ओलीताखालील एकूण जमिनीपैकी ४·८% जमिनीला कालव्याचे पाणी होते. २३·९% जमिनीला विहिरींचे व बाकीच्या जमिनीला इतर मार्गांनी पाणी मिळाले. राधानगरी येथे भोगावती नदीवर मोठे धरण बांधलेले असून तेथे सु. १·१ लक्ष किवॉ. तास वीज उत्पन्न होते. इतर लहान पाटबंधारे बरेच आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तांबडमातीच्या प्रदेशातील चिंचोळ्या सखल भागात भात व ऊस आणि डोंगरउतारावर नाचणी ही पिके होतात. मध्यभागातील हलक्या काळ्या जमिनीत भात, जोंधळा, भुईमूग, भाजीपाला, ऊस ही पिके होतात. पूर्वभागातील कसदार काळ्या जमिनीत जोंधळा, भुईमूग, मिरची, हळद, तंबाखू, कापूस, भाजीपाला, ऊस इत्यादींचे उत्पादन होते.
मृदा
शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा व बावडा तालुक्यांत तसेच करवीर, भुदरगड व आजरा तालुक्यांच्या पश्चिम भागात तांबडी, जांभ्या दगडाची माती आढळते. हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड व आजरा यांच्या काही भागांत हलकी काळी माती आढळते शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल व गडहिंग्लज या तालुक्यांत मध्यम व भारी काळी माती आहे. नद्यांच्या खोऱ्यांत ती खोल आहे.
वने आणि प्राणी
जिल्ह्याचा सु. १८·८% भाग वनाच्छादित आहे. तो मुख्यत: पश्चिमेकडील डोंगराळ भागातच आहे. त्यात जांभूळ, हिरडा, फणस, आंबा, कोकम, अंजन, सावर, शिसव, किंजळ, चंदन इ. सदापर्णी साग, धावडा, ऐन, हेद, बाभूळ खैर इ. ऋतुपर्णी व कुडा, वाकेरी, भारंग, वावडिंग, बेडकी, बिब्बा, बाहवा इ. औषधी वनस्पती आहेत. साग, काजू व सावर यांच्या लागवडी मुद्दाम केल्या आहेत. इमारती व जळाऊ लाकूड, कोळसा, चंदन, मध, मेण, हिरडा, काजू, शिकेकाई, चराऊ गवत यांचे चांगले उत्पन्न होते.
गवा, वाघ, चित्ता, बिबळ्या, सांबर, भेकर, अस्वल, रानडुक्कर, तरस, चितळ, ससा, लांडगा, रानकोंबडा इ. प्राणी जंगलात आढळतात. कावळा, चिमणी, पोपट, मोर, तित्तिर, घुबड वगैरे नेहमीचे पक्षी येथेही आहेत. साप, अजगर वगैरे सरपटणारे प्राणी व अनेक प्रकारचे कीटक, फुलपाखरे वगैरे आहेत. राधानगरी तालुक्यात गवा अभयारण्य स्थापन झालेले असून जंगली प्राणी नैसर्गिक अवस्थेत पाहण्याची सोय येथे केलेली आहे.
अर्थव्यवस्था
कोल्हापूर जिल्ह्यासहित कोल्हापूर शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे साहजिकच उसावर आधारित उद्योगधंद्याना इथे मोलाचे स्थान आहे. कोल्हापूर शहरात राजाराम सहकारी साखर कारखाना आहे.
कोल्हापुरी गूळ अखिल भारतातला उत्कृष्ट गूळ समजला जातो. येथे गुळ संशोधन केंद्राची स्थापनाही करण्यात आली आहे. कोल्हापूर हे येथील दुधासाठीही प्रसिद्ध असून गोकुळ, वारणा, शाहू, मयुर,स्वाभिमानी इत्यादी सहकारी दुग्धसंस्था इथे आहेत.
शिवाजी उद्यमनगर, वाय.पी.पोवारनगर, पांजरपोळ या कोल्हापूर शहरात असलेल्या औद्योगिक वसाहती आहेत. फाउंड्री उद्योगात कोल्हापूरने बरीच भरारी घेतली असून लोखंडाचे सुट्टे भाग बनवणारे सुमारे ४०० कारखाने इथे आहेत.कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी आहे.
कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात कोल्हापूरने घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. कोणतेही नव्याने होणारे बदल योग्य प्रकारे स्वीकारून आपल्या योग्य परंपरा पुढे ठेवण्याची कला कोल्हापूरला योग्य प्रकारे साधली आहे.
दळणवळण
कोल्हापूर शहर रस्ते व रेल्वे मार्गांने महाराष्ट्र व देशाच्या इतर शहरांसोबत जोडले गेले आहे. मुंबई ते चेन्नई दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ४ कोल्हापूर शहरामधून जातो. संपूर्णपणे चौपदरीकरण केलेल्या ह्या महामार्गाद्वारे पुणे, मुंबई तसेच कर्नाटकातील बेळगाव, बंगळूर इत्यादी शहरांपर्यंत जलद वाहतूक शक्य होते.
अनेक राज्य महामार्ग कोल्हापुराला कोकणाशी जोडतात. छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरातील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून देशाच्या अनेक मोठ्या शहरांपर्यंत रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. कोल्हापूर विमानतळ कोल्हापूर शहराच्या ९ किमी आग्नेयेस असलेल्या उजळाईवाडी या ठिकाणी आहे. सध्या येथून विमानसेवा उपलब्ध आहे.