Mi Pahilela Kabaddi Samna Essay In Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला कबड्डी चा सामना बघणार आहोत. दूरचित्रवाणीवर सामना पाहील्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यात काही वेगळाच आनंद असतो .
मी पाहिलेला कबड्डी सामना मराठी निबंध Mi Pahilela Kabaddi Samna Essay In Marathi
दूरचित्रवाणीवर सामने आपण घरबसल्या पाहतो. हजारो मैल दूरवर खेळाडू खेळत असतात आणि अगदी अक्षरश: खेळ चालु असताना आपण तो दूरचित्रवाणीवर पाहत असतो. घरबसल्या असा सामना पाहत असताना आपल्या आजूबाजूला क्वचित कोणीच नसते, क्वचित असतात आपले एक-दोन मित्र. पण प्रत्यक्षात मैदानात अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यातील आनंद अवर्णनीय आहे.
मी पाहिलेला एक चुरशीचा सामना कधीच विसरू शकत नाही. हा चुरशीचा सामना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंगच. राज्यपातळीवरचे कबड्डीचे सामने आमच्या शाळेच्या पटांगणावर सतत सात दिवस चालू होते.
सबंध महाराष्ट्र राज्यातून विविध संघ आले होते. त्यामुळे अनेक चुरशीचे सामने खेळले जात होते. शाळा, क्लास आणि अभ्यास यांमुळे सर्वच सामने पाहणे काही शक्य नव्हते. खेळाची शौकीन असलेली मुले मात्र अगदी अभ्यास बुडवूनही सामने पाहत होती आणि यावेळी त्यांना ते गुन्हे माफ होते.
आमच्या शाळेचा कबड्डीचा संघ अगदी कसलेला संघ होता. गायकवाड सर आणि तांबे सर मूलांना भरपूर सराव करायला लावतात. त्याबरोबरच रोजच्या व्यायामात देखील कधी सवलत मिळत नसे. त्यामुळे मुले अगदी चपळ बनली होती. प्रतिपक्षाच्या पकडीतून कसे सटकायचे याचे तंत्र त्यांनी चांगलेच आत्मसात केले होते.
संघासाठी आवश्यक असतील त्यापेक्षा तिप्पट मुले तयार होती. त्यामुळे एखादा खेळाडू आजारी पडला तरी अडचण होणार नव्हती. असा हा आमचा संघ अंतिम सामन्याला आला नाही, तरच नवल!
अंतिम सामना आमच्यात आणि विदर्भाच्या एका संघात होता. सामना चारला सुरू होणार होता, पण तीनपासूनच मैदान भरून गेले होते. प्रतिस्पर्धी संघ पाहणा आलेला असल्यामुळे त्यांच्या बाजूचे प्रेक्षक कमी होते. पण इतर संघांचे खेळाडू आम्हांला चिडविण्यासाठी विरुद्ध संघाचीच बाजू घेत होते.
दोन्ही संघ समोरासमोर उभे झाले आणि सामना सुरू झाला. विदर्भ संघातील खेळाडू आमच्या खेळाडूंच्या तुलनेने बरेच ताकदवान दिसत होते. आपल्या पोरांचा या मल्लांपुढे कसा निभाव लागणार? मनात शंकेची पाल चुकचुकली आणि पंचांनी शिट्टी फुकली.
आमच्या कप्तानाने टॉस जिंकून खेळायला सुरुवात केली होती. पण शेवटी आमच्या मनातील भीतीच खरी ठरली. त्या संघातील एका बलदंडाने आमच्या कप्तानाला अगदी सहजगत्या उभ्याउभ्याच धरले होते.
सुरुवातीलाच अपशकून झाल्याने धीर खचला आणि आमचे खेळाडू पटापट बाद होऊ लागले. आमचे आवाज बंद झाले आणि बाहेरून आलेल्या प्रेक्षकांच्या शब्दांना धार आली. मैदानाबाहेरच संघर्षाचे सामने रंगू लागले. शेम, शेम, हिप हिप् हुर्योच्या आवाजांनी वातावरण भरून गेले. आता आमच्या बाजूला फक्त एकच खेळाडू उरला होता.
पराभव नक्की दिसू लागला होता. पण तो एकांडा वीर डगमगला नव्हता. ‘कबड्डी-कबड्डी’ करीत तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात शिरला, अगदी सरळ आत.
तेव्हा प्रतिस्पर्धीयांनी त्याची पकड केली. पण त्याचा दम सूटला नव्हता. एक विलक्षण झटका देऊन तो आपल्या बाजूला परतला आणि खेळाचे चित्र पालटले. आमचे सर्व खेळाडू जिवंत झाले आणि विरुद्ध संघात एकच खेळाडू उरला.
आता सामन्यावर पकड आमची होती आ णि ती शेवटपर्यंत सुटली नाही. सामना आम्ही जिंकला होता. विदयार्थ्यांनी फक्त मैदानच उचलायचे बाकी ठेवले होते! खेळाडूंची मिरवणूक निघाली, सत्कार झाले व राज्यपातळीवर आमचा संघ विजयी ठरला. एशियाडमध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रदर्शनी सामन्यासाठी त्यातील काही जणांची निवड झाली. असा हा चुरशीचा सामना मी प्रत्यक्ष पाहिला होता. अनुभवला होता.