रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती Ratnagiri District Information In Marathi

Ratnagiri District Information In Marathi येवा कोकण आपुलाच असा…… अशी गोड हाक येतीये का ऐकु… ही हाक आहे ,कोकणातला मोठा जिल्हा रत्नागिरी! समुद्र लाभलेल्या जिल्हयाची शानच काही न्यारी असते… लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची जन्मभुमी….. रत्नागिरी.

Ratnagiri District Information In Marathi

रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती Ratnagiri District Information In Marathi

रत्नागिरीच्या पश्चिमेला सहयाद्रीच्या पर्वतरांगा पहायला मिळतात.रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. रत्‍नागिरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लहान शहर आणि रत्‍नागिरी जिल्ह्याचे ठिकाण आहे.

हे शहर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे.हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.

भारतरत्न आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे मुळात रत्नागिरी जिल्हयातलेच!!

इतिहास

पौराणिक मान्यतांनुसार आपल्या १४ वर्षाच्या वनवास कालावधीत पांडवानी तेराव्या वर्षी रत्‍नागिरी परिसरात वास्तव्य केले होते. नंतरच्या काळात येथील राजा वीरव्रत राय ह्याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवांविरुद्ध पांडवांची मदत केली होती.

विजापूरचे शासक पोत्तु श्री चेन्ना रेड्डी यांनी रत्‍नागिरीचा किल्ला बांधला. इ.स. १६७० मध्ये छत्रपती शिवाजींनी तो दुरुस्त केला. इ.स.१७२१ मध्ये रत्‍नागिरी सातारच्या छत्रपतींकडे होते. इ.स.१८१८ या वर्षी रत्‍नागिरी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.

ब्रह्मदेशाचा(म्यानमार) राजा थिबा याला ब्रिटिशांनी रत्‍नागिरीमध्ये थिबा राजवाड्यात ठेवले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनासुद्धा इंग्रजांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. तेथे त्यांनी अनेक समाजपयोगी कामे केली. त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यांसाठी खुले केलेले भारताच्या पहिले मंदिर आहे.

रत्नागिरी हा जिल्हा समुद्र किनारपट्टीवर असल्यामुळे या ठिकाणी समुद्र किनारपट्टीवर व्यापारी बंदरे होती आणि तेथून राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्यामुळे या भागामध्ये वेगवेगळ्या देशाचे व्यापारी या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येत होते आणि त्यामुळे या भागावर अनेक विदेशी लोकांनी राज्य केले आहे.

जसे कि ब्रिटीश, पोर्तुगीज. पण या सर्व विदेशी राजवटीपासून समुद्र किनारपट्टीवरील लोकांना दूर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला होता आणि तेथून समुद्र किनारपट्टीवरील हालचाली पाहिल्या जायच्या.

इ.स १८१८ मध्ये हा ब्रिटीशांच्या कडे गेला होता पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यावरील ब्रिटीशांचे राज्य गेले तसेच रत्नागिरी ही एके काळी विजापूर राज्यकर्त्यांची प्रशासकीय राजधानी होती.

१३ व्या वर्षी तीर्थयात्रा करून पांडव रत्नागिरी जिल्ह्याच्या लगतच्या प्रदेशात स्थायिक झाले होते आणि कुरुक्षेत्र येथे पांडव आणि कौरवांचे प्रसिद्ध युद्ध झाले होते, तेव्हा या प्रदेशाचा राजा वीरवत रे सोबत आला होता असे देखील म्हंटले जाते.

भूगोल

रत्‍नागिरी शहर १६.९८ उत्तर अक्षांश व ७३.३ पूर्व रेखांशावर वसले आहे. रत्‍नागिरी शहर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसले आहे. हे शहर समुद्रसपाटीपासून ११ मीटर उंच आहे.

रत्नागिरीच्या उत्तरेला रायगड जिल्हा, उत्तर पुर्वेला सातारा, पुर्वेला सांगली, दक्षिण पुर्वेला कोल्हापुर, दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आणि दक्षिण पश्चिमेकडुन उत्तर पश्चिमे पर्यंत अरबी समुद्र पसरलेला आहे.

प्राकृतिक दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचे तीन विभाग पडतात :

(१) सह्याद्री, (२) वलाटी किंवा पठारी प्रदेश, (३) खलाटी किंवा किनारपट्टीचा प्रदेश.

रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या रांगा असून हा संपूर्ण प्रदेश चढउतारांनी युक्त्त आहे. डोंगराळ प्रदेशाने जिल्ह्याची ८५% भूमी व्यापलेली आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत उंच व दुर्गम कडे आहेत. पर्वतरांगांदरम्यानच्या भागात खोल दऱ्या आहेत. दऱ्याखोऱ्यांच्या दक्षिणोत्तर लांबचलांब पसरलेल्या या पट्ट्यालाच ‘सह्याद्री पट्टा’ किंवा ‘बांद्री पट्टा’ असे म्हणतात.

सह्याद्रीच्या उंच शिखरांवर पूर्वी बांधलेले महिपतगड, सुभानगड, भैरवगड, प्रचितगड यांसारखे गड आहेत. प्रदेशाचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यात उतारावरून पाणलोट वाहतात व नद्यांना जाऊन मिळतात.

प्रदेशात जंगले खूप असून लोकसंख्या विरळ आहे. कशेडी, कुंभार्ली व आंबा हे या विभागातील प्रमुख घाट असून त्यांमधून अनुक्रमे रायगड, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांशी दळणवळण चालते.

डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी जो काहीसा सपाट व पठारी भाग दिसतो, त्यालाच ‘वलाटी’ असे म्हणतात. या पट्टीत काळी व तांबडी जमीन तसेच जांभा व बेसाल्ट प्रकारचे खडक आहेत. भात हे या भागातील मुख्य पीक आहे. वलाटीच्या पश्चिमेला जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्यालाच ‘खलाटी’ असे म्हणतात.

किनारपट्टीवरील जमीन रेतीमिश्रित असून तीत प्रामुख्याने नारळाची लागवड केलेली आढळते. जिल्ह्यातील बरीचशी लोकसंख्या याच प्रदेशात केंद्रित झालेली आहे. समुद्राच्या कडेला ज्या ठिकाणी डोंगरासारखे उंच भाग आहेत, तेथे किल्ले बांधलेले दिसतात. सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, गोपाळगड हे अशा प्रकारचे किल्ले आहेत. रत्नदुर्ग व जयगड येथील दीपगृहे महत्त्वाची आहे.

नद्या

जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेत उगम पावून पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यांची लांबी ६५ किमी. पेक्षा अधिक नाही. शास्त्री, वाशिष्ठी, अंबा, जगबुडी, नळकडी, मुचकुंदी, जोग, काजळी व शुक (वाघोटन) या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत.

सह्याद्रीच्या डोंगराळ भागात तीव्र उतारामुळे नद्या वेगाने वाहतात. पुढे वलाटी व खलाटीच्या प्रदेशांत त्यांना इतर प्रवाह मिळून त्यांचा आकार वाढतो. जिल्ह्यातील नद्यांना पावसाळ्यात पूर येतात, तर उन्हाळ्यात बहुतेक नद्या कोरड्या पडतात.

फक्त्त वाशिष्ठी नदीला बारमाही पाणी असते, कारण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर पोफळी (रत्नागिरी) येथे वीज तयार केल्यानंतर ते पाणी पुढे वाशिष्ठी नदीत सोडले जाते. त्या पाण्याचा उपयोग पुढे वाशिष्ठीच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी केला जातो.

हीच जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाची नदी आहे. सह्याद्रीच्या तिवरे भागात तिचा उगम होतो. तिची लांबी सु. ४८ किमी. असून समुद्रकिनाऱ्यापासून ४० किमी. पर्यंत या नदीतून वाहतूक केली जाते. उत्तरेकडील जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी असून तिचा उगम सह्याद्रीतील हटलोट खिंडीजवळ होतो.

उत्तरेस रत्नागिरी–रायगड सरहद्दीवरून वाहणारी सावित्री नदी महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावते.जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्या व खाड्या भरतीचे पाणी घेणाऱ्या आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने नद्यांचे मुखाकडील प्रवाह फार उपयुक्त्त आहेत.

नद्यांच्या दोन्ही तीरांवर काही प्रमाणात सुपीक जमिनी असून त्या शेतीसाठी महत्त्वाच्या आहेत. अरबी समुद्रकिनाऱ्यावरील बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापूर या खाड्या विशेष प्रसिद्ध आहेत.

राजकीय संरचना

  • रत्नागिरी जिल्ह्यात
  • लोकसभा मतदारसंघ
  • रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग.हा एक आहे.

विधानसभा मतदारसंघ पाच आहेत पुढीलप्रमाणे:-

दापोली, गुहागर, चिपळूण, रत्‍नागिरी व राजापूर.

रत्नागिरी जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत.

रत्नागिरी, खेड, गुहागर, चिपळुण, दापोली, मंडणगड, राजापुर, लांजा, संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत. सर्वांत उत्तरेला मंडणगड तालुका व सर्वांत दक्षिणेला राजापूर तालुका आहे.

क्षेत्रफळाने संगमेश्वर तालुका हा सर्वांत मोठा, तर मंडणगड तालुका सर्वांत लहान आहे. जिल्ह्यात एकूण १,३९२ खेड्यांचा समावेश होतो त्यांपैकी चार ओसाड खेडी आहेत. रत्नागिरी (लोकसंख्या ४७,०३६–१९८१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार रत्‍नागिरीची लोकसंख्या ७६,२३९ एवढी आहे. याच्या ५५% पुरुष व ४५% स्त्रिया आहेत. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८,२०८वर्ग कि.मी.आहे.जिल्ह्यातील

साक्षरतेचे प्रमाण ८२.१८% असून ८०%पुरुष व ८७% स्त्रिया साक्षर आहेत .लिंग गुणोत्तर प्रमाण १००० पुरूषामागे स्त्रियांचे प्रमाण ११२३ एवढे आहे.

एकूण लोकसंख्येच्या सुमारे ७०% हिंदू असून उर्वरित मुस्लिम, जैन, बुद्ध व ख्रिश्चन जातीचे आहेत.रत्‍नागिरीतील ११% लोकसंख्या ही ६ वर्षाखाली आहे.

जिल्ह्यात औद्योगिकीकरण कमी प्रमाणात झालेले आहे तसेच शेतीयोग्य जमीन थोडी असल्याने शेतीमधील उत्पन्न वर्षभर पुरत नाही म्हणून घरातील तरुण वर्ग मुंबईला नोकरी करतो. रोजगारासाठी मुंबईकडे लोकसंख्येचे, विशेषतः पुरुषांचे, सातत्याने स्थलांतर घडून येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे.

डोंगराळ प्रदेशात धनगर राहत असून ते शेतीही करतात. याच भागात कातकरी राहतात. कातकरी मध गोळा करणे, शिकार करणे यांसारखे व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. रत्नागिरी जिल्ह्यात मुसलमानांची संख्याही बरीच आहे. बरेच मुसलमान आखाती देशांत नोकऱ्यांसाठी जातात. जिल्ह्यात अनुसूचित जाति-जमातींचेही लोक आहेत.

रत्नागिरी जिल्हयातील मृदा प्रकार

  • जांभा खडकांपासून बनलेली मृदा आहे. ऑक्सिडीकरण प्रक्रियेमुळे तिचा रंग  गर्द लाल ते तांबूस – तपकिरी असा आढळतो.
  • येथील मृदेचे वर्गीकरण खालील ४ प्रकारात करता येते
  • भातासाठी उपयुक्त – ओलावा धरून ठेवणारी जमीन जेथे भाताचे पीक घेण्यात येते
  • नारळ-सुपारी साठी – समुद्र किनार्‍यालगतची मृदा
  • आंबा, काजू यांसारख्या फळांचे व नाचणीचे पीक घेण्यासाठी डोंगरउताराची वरकस जमीन
  • क्षारयुक्त जमीन लागवडीस अयोग्य जमिन आहे.

खनिजे

रत्नागिरी जिल्ह्यात बॉक्साइट, चिनी माती, डोलोमाइट, मँगॅनीज, सिलिका, क्रोमाइट व इल्मेनाइट हे खनिज पदार्थ मिळतात. जिल्ह्यात जांभा दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो. जांभा दगड कापून त्याच्या चौकोनी विटा काढतात. त्यांचा बांधकामासाठी उपयोग केला जातो. काळीथर हा दगड डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सापडत असून, त्या दगडापासून मोठमोठे खांब व खडी तयार केली जाते.

त्याशिवाय कुरुंदाचा दगडही येथे मिळतो. मालगुंड, तिवरे, पूर्णगड या भागांत इल्मेनाइट खनिज मिळते. राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावाच्या आसपास सिलिकायुक्त्त वाळू अधिक मिळते. काच तयार करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो.

दापोली, मंडणगड या तालुक्यांतून बॉक्साइट मिळते. राजापूर, दापोली व चिपळूण तालुक्यांत चिकणमाती मिळते. तिचा उपयोग मंगलोरी कौले, विटा, फरशा व भांडी तयार करण्याकरिता होतो.

हवामान

समुद्रसान्निध्य लाभल्याकारणाने हवामान उष्ण, दमट व सम प्रकारचे असते. मे महिना सर्वाधिक तापमानाचा, तर जानेवारी महिना किमान तापमानाचा असतो. मोसमी हवामान असल्याने जिल्ह्यात तीन ऋतू स्पष्टपणे दिसून येतात.

हिवाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान २८0 से. व किमान तापमान २०0 से., तर उन्हाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान ३०0 ते ३३0 से. व किमान तापमान २१0 ते २६0 असते. उंचीमुळे सह्याद्रिपट्टीतील हवामान थंड असते. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर तापमानाची तीव्रता कमी होते.

जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे चार महिने पावसाळा ऋतू असून या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. जुलै महिन्यात सर्वांत जास्त पाऊस पडत असून तो वार्षिक पर्जन्यमानाच्या सु. एक-तृतीयांश असतो. पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे सह्याद्री पर्वताकडे वाढत जाते. घाटमाथ्यावर पर्जन्य सर्वाधिक पडतो. जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३३० सेंमी. आहे. हवेतील आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी क्वचितच असते.

शेती

भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हलक्या जमिनींमध्ये नाचणी, वरी, तीळ इ. खरीप पिके घेतली जातात. रत्नागिरी-२४, जया, सोना, पंकज अशा भाताच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातीही लावल्या जातात. यांशिवाय कोळंबा, पटणी, भडस, वरंगळ या प्रकारच्या भातांचीही लागवड केली जाते. भातापासून पोहे व चुरमुरे तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.

दापोली येथील कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. राजापूर, संगमेश्वर, चिपळूण व खेड तालुक्यांत भाताच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. रब्बी हंगामात वाल, कुळीथ, मूग, पावटा, उडीद, चवळी यांसारखी पिके घेतली जातात. थोडीबहुत मिरचीची लागवड केली जाते. आंबा, फणस, काजू, रातांबे, नारळ, सुपारी इ. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके आहेत.

येथील हापूस आंबा प्रसिद्ध असून तो परदेशांतही पाठवला जातो. डोंगरउतारावरील तांबड्या जमिनीत व खाऱ्या हवेत हापूस आंब्याचे उत्पादन चांगले मिळते. हापूसशिवाय पायरी, माणकुर या जातीच्या आंब्यांचीही लागवड केली जाते. रायवळ आंब्याचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते.

रातांबीच्या झाडाला येणाऱ्या फळांना कोकम म्हणतात. कोकम फळापासून मिळणारी उत्पादनेही घेतली जातात. नारळ हे किनारी प्रदेशातील प्रमुख उत्पादन आहे. रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूण तालुक्यांमध्ये नारळाखालील क्षेत्र अधिक आहे.

गुहागर, राजापूर, रत्नागिरी, दापोली व मंडणगड तालुक्यांत पोफळीची मोठाली आगरे आहेत. त्यांपासून सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. फणस हे तर जिल्ह्याचे वैशिष्ट्यच आहे.शेतीबरोबरच कुक्कुटपालन व पशुपालन हे जोडव्यवसाय केले जातात.

रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य अन्न

भात, नाचणी अथवा तांदळाची भाकरी, भाजी आणि मासे हे लोकांचे मुख्य अन्न आहे. जेवणामध्ये कोकमचे सार घेण्याची पद्धत आहे. तांदूळ, गहू व खोबरे यांची पक्वान्ने बनवितात.

उद्योगधंदे

रत्नागिरी जिल्ह्यात लोहमार्ग अजिबात नाहीत. जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणातील ही महत्त्वाची समस्या आहे.

कच्च्या मालाचा तुटवडा, लोहमार्ग व हवाईमार्ग यांसारख्या दळणवळण साधनांचा अभाव व प्रशिक्षित कामगार पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्याची औद्योगिक प्रगती फारच अल्प झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील जे अविकसित जिल्हे आहेत, त्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश होतो. हा मागासलेपणा घालविण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासनांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.

समुद्राशी संबंधीत व्यवसाय रत्नागिरीत मोठया प्रमाणात असुन येथील अर्थव्यवस्था ब.याच प्रमाणात समुद्राशी निगडीत आहे.रत्नागिरीचा महत्वाचा व्यवसाय मासेमारी आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला सु. १६७ किमी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातील दालदी, खारवी, भंडारी, गाबीत व कोळी हे लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. सप्टेंबर ते मेपर्यंत मासेमारीचा व्यवसाय चालतो. खाडीमध्ये मात्र बाराही महिने मासळी पकडता येते. किनारपट्टीवर रापण, पाग, गरी (जाळे, काठी, दोर) इ. साधनांच्याद्वारे मासेमारी केली जाते.

अधिक खोल समुद्रात यांत्रिक होड्यांच्या साहाय्याने मासेमारी केली जाते.अरबी समुद्रात सुरमई, बांगडा, कर्ली, रावस, पापलेट, पेडवे, रेणवे, कोळंबी इ. जातींची मासळी मिळते. जिल्ह्याच्या लगतच्या समुद्रात कोळंबी मोठ्या प्रमाणावर सापडते. कोळंबीची निर्यातही मोठ्या प्रमाणावर केली जाते.

हापूसशिवाय पायरी, माणकुर या जातीच्या आंब्यांचीही लागवड केली जाते. रायवळ आंब्याचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते. आंब्यापासून लोणची, मुरांबे, आंबा पोळी, आंबावडी इ. पदार्थ तयार करण्याचा तसेच आंब्याचा रस काढून तो हवाबंद डब्यात भरण्याचा (कॅनिंगचा) व्यवसाय चालतो.

आंब्यासाठी लागणारी लाकडी खोकी व बांबूच्या करंड्या तयार करणे हा पूरक व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो.नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे, नारळ व नारळाच्या झाडापासून काथ्या, ब्रश, दोरखंडे, पायपुसणी, पिशव्या, केरसुण्या इ. वेगवेगळ्या उपयुक्त वस्तू तसेच शोभेच्या वस्तू बनविण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात.

त्याचप्रमाणे माडाच्या झाडापासून नीरा मिळविली जाते. माडाच्या कमी उंचीच्या व जास्त नारळ देणाऱ्या नवीन जाती शोधून काढण्यासाठी रत्नागिरीजवळील, भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. बाणोली, सिंगापुरी, टी. डी. अशा माडाच्या नवीन जातींची लागवड करण्यात येते.

गुहागरी नारळ विशेष प्रसिद्ध मानला जातो, कारण त्याची चव चांगली असते.फणसाचे गरे वाळविणे, फणस पोळी तयार करणे हे त्यांवर आधारित व्यवसाय चालतात. येथील काजूला परदेशांतही मोठी मागणी असते.

काजूचे गर काढणे, ते हवाबंद डब्यात भरणे, बाजारपेठेत पाठविणे हे व्यवसाय मुख्यतः रत्नागिरी तालुक्यात शिरगाव व खेडशी येथे अधिक चालतात. देवरूखजवळील सडवली येथे गुच्छ गवताची (सिट्रोनेला ग्रास) लागवड केलेली आहे. त्या गवतापासून तेल काढतात. हे तेल अत्तर, उदबत्ती, साबण इ. सुगंधी वस्तू बनविण्यासाठी उपयोगी पडते.

वाहतुकीची साधने

रत्‍नागिरी हे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या (एस. टी.) बससेवेने जोडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग तसेच रत्‍नागिरीला कोल्हापूरसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग २०४ हे प्रमुख हमरस्ते रत्‍नागिरीमध्ये मिळतात.

रत्‍नागिरी रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई, दिल्ली तसेच दक्षिणेकडील अनेक राज्यांत प्रवास करण्यासाठी थेट रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत.

कोकण रेल्वे प्रकल्प, देशाला बहाल करण्याचा कार्यक्रम, २००० साली, रत्‍नागिरी शहरातूनच पार पडला होता. छशिट-मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस, लोटिट-मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस, लोटिट-मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस इत्यादी गाड्यांमुळे रत्‍नागिरी ते मुंबई हा जलद रेल्वे प्रवास सुलभ झाला आहे.

रत्‍नागिरी हे एक उत्तम नैसर्गिक बंदर असून ते मिरकरवाडा येथे आहे. जयगड येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जात आहे. फिनोलेक्स व अल्ट्राटेक या कंपन्यांच्या खाजगी जेट्टी रत्‍नागिरीमध्ये आहेत.

रत्‍नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. २०१८ मध्ये येथून मुंबई साठी विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे.

वनस्पती व प्राणी

जिल्ह्यातील ४९·६१ चौ. किमी. क्षेत्र म्हणजेच जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या १·२२% क्षेत्र अरण्यांखाली आहे. त्यापैकी ११·२९ चौ. किमी क्षेत्रातील अरण्ये राखीव आहेत. बहुतेक क्षेत्र वनखात्याच्या अधिकाराखालील आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सह्याद्रिपट्टीत मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजे, राजापूर या तालुक्यांत जंगलांचे प्रमाण जास्त आहे.

सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये आहेत. त्याच्या पश्चिमेला पानझडी वृक्ष दिसून येतात. जंगलांमध्ये साग, शिसव, नाणा, किंजळ, शिवण, हिरडा, खैर इ. महत्त्वाच्या वृक्षांच्या जाती आहेत. जंगलांतून लाकडाचे उत्पादन मिळविले जाते.

त्याशिवाय मध, मेण, डिंक, कात, लाख, रंग, औषधी वनस्पती, कातडी कमावण्यासाठी लागणारे पदार्थ अशी दुय्यम उत्पादनेही जंगलांतून मिळतात. अलीकडे रबराच्या झाडांची लागवडही करण्यात आलेली आहे. जंगलांत वाघ, लांडगा, सांबर, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरिण इ. प्राणी दिसून येतात.

सण

गौरी-गणपती व शिमगा हे प्रमुख सण असून त्यावेळी मुंबईहून चाकरमानी आपापल्या घरी आवर्जून येतात. गौरी-गणपतीच्या सणाला भजने-फुगड्या यांचा कार्यक्रम, तर शिमग्याच्या वेळी पालखी नाचविण्याचा कार्यक्रम चालतो. कोळी लोक नारळी पौर्णिमेचा सण आनंदाने साजरा करतात.

रत्नागिरी जिल्हयातील महत्वाची स्थळे

रत्नागिरी :-

लोकमन्या टिळक जन्मस्थान, रत्नदुर्ग किल्ला, भगवती बंदर(भात्ये), थिबा राजवाडा, पतितपावन मंदिर (सावरकरांचे सामाजिक कार्य.)

गणपतीपुळे :

रत्नागिरी पासुन साधारण 40 कि.मी. अंतरावर गणपतीपुळे हे स्वयंभु गणेशाचे मंदिर असुन साधारण 400 वर्षांपुर्वी पासुन हे मंदिर असल्याचे येथील भावीक सांगतात.

भात्ये :-

कोकण कृषि विध्यापीठांतर्गत असलेले नारळ संशोधन केंद्र.

दापोली :-

बाळासाहेब सावंत कोकण कृषि विध्यापीठ. रत्नागिरीचे महाबळेश्वर असे म्हणतात

हर्णे :-

बंदर, सुवर्णदुर्ग (जलदुर्ग)

बाणकोट :-

बंदर (खाडीच्या मुखाशी असलेले बंदर) मंडणगड तालुक्यात.

दाभोळ :-

मासेमारी केंद्र

पन्हाळेकामी :-

कोरीव लेणी (ढापोली तालुक्यात)

उन्हाळे :-

राजपुरजवळ गरम पाण्याचे झरे. राजपूरची गंगा प्रसिद्ध आहे

केळशी :-

याकुब बाबांची दर्गाह

संगमेश्वर :-

1) बाबा व घारेश्वर गंगा या नाद्यांच्या संगमावरील ठिकाण.

2) कर्णेश्वराचे मंदिर प्रसिद्ध

3) संभाजी महाराज स्मारक

पावस :-

स्वामी स्वरूपानंद समाधी आहे.

रत्नागिरी जिल्हयातील गरम पाण्याचे झरे

उन्हाळे —-

राजापूर तालुका (राजापूर येथेही गरम पाण्याचे झरे आहे.)

उन्हावरे —-

दापोली तालुका.

आरवली—-

संगमेश्वर तालुका.

राजवाडी —-

संगमेश्वर तालुका.

गड व किल्ले

बरेच गड आणि किल्ले या जिल्हयात आजही आपल्याला पहायला मिळतात त्यातले काही महत्वाचे म्हणजे जयगड, पालगड, पूर्णगड, प्रचितगड, भवानीगड, महिपतगड, यशवंतगड, रत्नदुर्ग, विजयगड, सुवर्णदुर्ग, गोपाळगड, गोविंदगड, जयगड हे सांगता येतील.

धन्यावाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

रत्नागिरी काय प्रसिद्ध आहे?

हे नगर अरबी समुद्राच्या किनारी वसले असून भारताचे एक प्रमुख बंदर आहे. कोकणातील सात महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुके किती व कोणते?

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत. सर्वांत उत्तरेला मंडणगड तालुका व सर्वांत दक्षिणेला राजापूर तालुका आहे.

महाराष्ट्रात किती किनारी जिल्हे आहेत?

महाराष्ट्र राज्यात सुमारे 720 किमी लांबीचा इंडेंटेड समुद्रकिनारा आहे, ज्यामध्ये प्रमुख मुहाने आणि अरुंद खाड्या आहेत. त्यात ठाणे, रायगड, ग्रेटर बॉम्बे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी जिल्ह्यांचा समावेश होतो.

रत्नागिरीतून कोणती मुख्य नदी वाहते?

रत्नागिरी जिल्ह्यात वाशिशी, जगबुडी, सावित्री, बाव, रत्नागिरी, मुकचुंडी, जैतापूर इत्यादी प्रमुख नद्या आहेत. त्या सह्याद्री पर्वतात फुगून पश्चिमेकडे वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात. नदीचे खोरे उथळ असल्याने पावसाळ्यात त्यांचा प्रवाह खूप वेगवान असतो.

रत्नागिरी हे नाव कसे पडले?

रत्नागिरी हे नाव कसे प्रचलित झाले याचा अचूक अंदाज नाही, परंतु “रतनगिरी” या एका भिक्षूच्या नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्याची समाधी “रत्नदुर्ग” किल्ल्यावर पाहता येते, याचा पुरावा आहे. तसेच काही पौराणिक पुराव्यांवरून गावाला “रत्नागिरी” हे नाव पडले.