मंडळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील बहुतांश सरकारी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर कमी केले आहेत. त्यामुळे एफडीवरील परतावा घटला आहे. अशा परिस्थितीत, जर अधिक परताव्याचा पर्याय हवा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.
पोस्ट ऑफिसच्या पाच प्रमुख बचत योजनांबद्दल माहिती पुढीलप्रमाणे आहे.
सुकन्या समृद्धी योजना ही मुलीच्या भविष्याचा विचार करून सुरू करण्यात आलेली एक योजना आहे. या योजनेत दरवर्षी किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवणूक करता येते. यावर सध्या ८.२० टक्के व्याजदर लागू आहे. खातं उघडल्याच्या तारखेपासून १५ वर्षांपर्यंत रक्कम जमा करता येते. तसेच, या योजनेवर आयकर कलम ८० सी अंतर्गत करसवलतही मिळते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही विशेषतः ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी आहे. या योजनेत किमान १,००० रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवता येतात. सध्या या योजनेवर ८.२० टक्के व्याजदर लागू आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून, तो आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येतो. या योजनेवरही कलम ८० सी अंतर्गत करसवलत दिली जाते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित योजना आहे. यात किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये वार्षिक गुंतवता येतात. सध्या ७.१० टक्के व्याजदर लागू आहे. या योजनेची मुदत १५ वर्षांची आहे. या योजनेत गुंतवलेली रक्कम आणि मिळणारे व्याज दोन्ही करमुक्त आहेत. याशिवाय कर्ज घेण्याची आणि अंशता पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.
किसान विकास पत्र ही आणखी एक आकर्षक योजना आहे. यात किमान १,००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे आणि जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. या योजनेवर ७.५० टक्के व्याज मिळते. गुंतवणूक दोन वर्षे सहा महिन्यांनंतर काढता येते. मात्र या योजनेवर कोणताही करसवलतीचा लाभ मिळत नाही. कोणताही भारतीय नागरिक किंवा अल्पवयीन व्यक्ती किसान विकास पत्र खरेदी करू शकतो.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही पाच वर्षांची सुरक्षित योजना आहे. यात किमान १,००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे आणि जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. सध्या यावर ७.७० टक्के व्याजदर आहे. या योजनेत आयकर कलम ८० सी अंतर्गत करसवलत मिळते, परंतु व्याजावर थेट टीडीएस कपात केली जात नाही. मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा काही विशेष परिस्थितीत उपलब्ध आहे, मात्र त्यावर व्याजदरात कपात होऊ शकते.
सर्वच योजना सुरक्षित असून भारत सरकारच्या पाठिंब्याने चालवल्या जातात. त्यामुळे एफडीच्या तुलनेत जास्त परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा विचार नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.