मित्रांनो UPI (Unified Payments Interface) वापरणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. पेमेंट करताना होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांवर आता प्रभावी उपाय केला जाणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने यासाठी एक नवा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे UPI व्यवहार आणखी सुरक्षित होतील.
काय आहे NPCI चा नवा नियम?
NPCI ने 24 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व UPI अॅप्सना 30 जून 2025 पासून हा नवीन नियम लागू करावा लागेल. या नियमानुसार, जेव्हा वापरकर्ता कोणालाही – व्यक्तीला (P2P) किंवा व्यापाऱ्याला (P2PM) – पैसे पाठवेल, तेव्हा पेमेंटच्या अंतिम पुष्टीकरण स्क्रीनवर संबंधित प्राप्तकर्त्याचे बँकेच्या कोअर बँकिंग सिस्टममध्ये (CBS) नोंदणीकृत असलेले सत्यापित (Verified) पूर्ण नावच दिसेल.
आधी कसे होते आणि आता काय बदलणार?
पूर्वी UPI व्यवहारात QR कोड स्कॅन केल्यावर, Alias (टोपणनाव), सेव्ह केलेले नाव किंवा संपर्क यादीतील नाव दिसत असे. ही सुविधा जरी सोयीची असली, तरी अनेकदा याचा गैरफायदा घेतला जात होता. फसवणूक करणारे बनावट UPI ID तयार करून प्रसिद्ध व्यक्ती किंवा ब्रँडच्या नावाने लोकांची फसवणूक करत असत.
आता नव्या नियमामुळे वापरकर्त्याला पेमेंट करताना फक्त अधिकृत, बँकेने सत्यापित केलेले नावच दिसेल. यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
अल्टिमेट बेनिफिशियरी म्हणजे काय?
NPCI नुसार अल्टिमेट बेनिफिशियरी म्हणजे ज्याच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होतात – ती व्यक्ती किंवा संस्था. हे नाव बँकेच्या CBS डेटावर आधारित असल्याने पूर्णपणे सुरक्षित आणि बदल अयोग्य आहे. त्यामुळे वापरकर्त्याला खात्रीपूर्वक हे कळेल की तो योग्य व्यक्तीला पैसे पाठवत आहे.
पैसे पाठवण्याची प्रक्रिया तीच राहणार
या बदलामुळे पैसे पाठवण्याची सध्याची पद्धत – UPI आयडी, फोन नंबर, किंवा QR कोड – पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. फक्त पेमेंट कन्फर्म करण्याच्या शेवटच्या टप्प्यात दाखवले जाणारे नाव हे टोपणनाव नसून बँकेतील सत्यापित नाव असेल.
वापरकर्त्यांचा आत्मविश्वास वाढणार
या नव्या नियमानंतर डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेसचे राहुल जैन यांच्या मते, CBS व्हेरिफिकेशनमुळे बनावट नावांनी फसवणूक करणाऱ्यांना अडथळा निर्माण होईल. वापरकर्त्यांना प्रत्यक्ष प्राप्तकर्त्याचे खरे नाव दिसल्यामुळे विश्वास वाढेल आणि चुकीचे व्यवहार होण्याची शक्यता कमी होईल.