मंडळी सोन्याच्या दराने प्रतिदहा ग्रॅमला एक लाख रुपयांचा टप्पा गाठल्याने ग्राहक आणि गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सध्या फक्त ज्यांच्या घरी लग्नकार्य आहे, तेच आवश्यक तेवढे सोने-चांदी खरेदी करत आहेत. वाढत्या किमतींमुळे बहुतेक गुंतवणूकदार दरात घट होण्याची वाट पाहत आहेत. सुवर्णव्यावसायिकांच्या माहितीनुसार सध्या सोने विक्रीत ३० ते ३५ टक्के घट नोंदवली जात आहे.
अमेरिकेने आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केल्यानंतर थोडक्याच काळासाठी सोन्याचे दर घसरले होते. मात्र टेरिफला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या किमतींनी उसळी घेतली. २३ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा दर जीएसटीसह प्रतिदहा ग्रॅमसाठी एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत पोहोचला होता.
वाढत्या दरांमुळे लग्नसराईत वधू-वर पित्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये लग्नाच्या खर्चात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा वाटा २० ते २५ टक्के असतो. आजच्या घडीला केवळ किमान आवश्यक दागिने खरेदीसाठीही दोन ते तीन लाख रुपयांची तरतूद करावी लागत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत दागिन्यांचे बजेट सुमारे ४० हजार रुपयांनी वाढले आहे. महागाईमुळे पोशाख किंवा जेवणात थोडेसे काटकसर केली जाऊ शकते, पण सौभाग्याचे मणी, मंगळसूत्र, जोडवे आणि इतर पारंपरिक दागिने खरेदी करणं अपरिहार्यच आहे, असे अनेक लग्नघरातील कुटुंबीय सांगतात.
चार-पाच महिन्यांपूर्वी ठरलेल्या लग्नांसाठी केलेल्या अंदाजपत्रकात आता २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली असून, परिणामी लग्नाचा एकंदर खर्चही वाढल्याचे स्पष्ट होत आहे.