मंडळी भारतीय हवामान खात्याने (IMD) देशभरातील विविध भागांमध्ये पुढील सात दिवसांत उष्णतेच्या लाटेसह काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही राज्यांमध्ये सूर्याचा तीव्र तडाखा जाणवणार आहे, तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
ईशान्य भारतात विशेषता आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात २२ ते २६ एप्रिलदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांत २३ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये वारे ३० ते ५० किमी/तास वेगाने वाहू शकतात.
दक्षिण भारतात केरळ, तटीय आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. तामिळनाडू, पुडुचेरी आणि तेलंगणामध्ये पुढील सात दिवस विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वीज चमकणे, गडगडाट, पाऊस आणि ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर आणि मध्य पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या चक्रीवादळीय प्रणालीमुळे ही स्थिती उद्भवत आहे.
मध्य महाराष्ट्रात २४ आणि २५ एप्रिल रोजी पावसाची शक्यता असून, गुजरातमध्ये २२ ते २४ एप्रिलदरम्यान मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भातील चंद्रपूर येथे रविवारी तापमान ४४.६ अंश सेल्सियसवर पोहोचले असून, हे देशातील सर्वाधिक तापमान होते.
तापमानात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून, उत्तर-पश्चिम भारतात पुढील सहा दिवसांत तापमान २ ते ३ अंशांनी वाढेल. मध्य भारत आणि गुजरातमध्ये पुढील तीन दिवसांत २ अंशांची वाढ अपेक्षित आहे. पूर्व भारतात ही वाढ ४ ते ६ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते.
देशातील ११ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व राजस्थानमध्ये २२ ते २६ एप्रिलदरम्यान, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशामध्ये २२ ते २५ एप्रिलपर्यंत ही लाट जाणवण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये २३ ते २५ एप्रिल, गंगा मैदानी क्षेत्र (पश्चिम बंगाल) आणि पश्चिम राजस्थानमध्ये २३ ते २६ एप्रिल, तसेच बिहार आणि झारखंडमध्ये २५ ते २६ एप्रिल दरम्यान तापमान वाढेल.
बिहारमधील अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमानही वाढलेले राहण्याची शक्यता आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरातही तापमान वाढत असून, पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहील. या काळात कमाल तापमान ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. गेले २४ तासांत येथील कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सियस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे.