मंडळी आपल्यापैकी अनेकांनी बँकेकडून कर्ज घेतलेले असते, तर काहीजण भविष्यात कर्ज घेण्याचा विचार करत असतात. अशा वेळी सिबिल स्कोर हा एक महत्त्वाचा विषय ठरतो. बँका किंवा अन्य वित्तीय संस्था कर्ज मंजूर करण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोर तपासतात. जर स्कोर चांगला असेल, तर कर्ज सहज मिळते, पण स्कोर कमी असल्यास कर्ज नाकारले जाऊ शकते किंवा अधिक व्याजदर आकारला जातो.
सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान असतो. स्कोर जितका जास्त, तितकी आर्थिक शिस्त आणि कर्ज परतफेडीची क्षमता चांगली मानली जाते. हा स्कोर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित असतो – म्हणजेच वेळेवर कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरले आहे की नाही, याचा परिणाम त्यावर होतो.
सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सर्वात पहिले म्हणजे वेळेवर EMI आणि क्रेडिट कार्ड बिलाचे पेमेंट करणे. यासाठी ऑटो-पे सुविधा वापरणे फायदेशीर ठरते, कारण त्यामुळे तुमच्या बँक खात्यातून आपोआप आणि वेळेत पैसे वजा होतात.
जर एखाद्या महिन्यात कोणत्याही कारणाने EMI थकवायची वेळ आली, तर बँकेशी त्वरित संपर्क साधा आणि नवीन पेमेंट योजनेबाबत चर्चा करा. यामुळे डिफॉल्ट टाळता येतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रेडिट युज रेशो – म्हणजेच तुमचा वापरलेला क्रेडिट मर्यादेच्या तुलनेत किती आहे. हे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा कमी ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा एक लाख रुपये असल्यास महिन्याला 30 हजारांपेक्षा जास्त खर्च करू नये.
जर तुमचा मासिक खर्च जास्त असेल, तर बँकेकडून क्रेडिट लिमिट वाढवून घेण्याचा विचारही करता येतो. हे सर्व उपाय केले तर सिबिल स्कोर नक्कीच सुधारेल आणि भविष्यात कर्ज मिळवणे अधिक सोपे होईल.