मंडळी सध्या महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेती, यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय वाढलेला आहे. पण आजही अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्या पुढे पाऊल टाकू शकत नाहीत. भांडवलाची कमतरता, कर्जासाठी लागणारी तारण, किंवा पुरेशी माहिती नसेल यामुळे त्या आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे – उद्योगिनी योजना. ही योजना खास महिलांसाठी आहे आणि यामध्ये कोणतीही तारण न देता पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे हा आहे.
उद्योगिनी योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या व्यवसायांना चालना दिली जाते. उदाहरणार्थ ब्युटी पार्लर, बांगड्या बनवणे, पापड-लोणचं तयार करणे, बेडशीट व टॉवेल तयार करणे, नोटबुक व बुक बाइंडिंग, कॉफी-चहा विक्री, ड्रायक्लिनिंग, रोपवाटिका, कापड व्यवसाय, पोल्ट्री व दुग्ध व्यवसाय अशा अनेक लघुउद्योगांमध्ये महिलांना कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत ३ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते आणि तेही कोणतीही गहाण न लावता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला इच्छुकांनी काही राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँका तसेच काही खाजगी बँका या योजनेअंतर्गत कर्ज पुरवतात. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि व्यवसायाशी संबंधित माहिती अशी कागदपत्रे सादर करावी लागतात.
उद्योगिनी योजनेची अधिकृत वेबसाइट म्हणजे udyogini.org. या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवता येते तसेच अर्जाची प्रक्रिया समजून घेता येते.
आज महिलांसमोर विविध संधी उपलब्ध आहेत. अशा वेळी एक छोटीशी मदत त्यांना स्वप्नपूर्तीकडे नेऊ शकते. उद्योगिनी योजना ही अशीच एक पायरी आहे – जी महिलांना आत्मनिर्भर बनवते. तुमच्याकडे एखादी कल्पना असेल आणि ती प्रत्यक्षात उतरवायची असेल, तर ही योजना तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. आता वेळ आहे स्वतःसाठी एक पाऊल उचलण्याची.