अवकाळी पावसाचे ढग दूर झाले असले तरी राज्यावर आता उष्णतेचे संकट गडद झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात उष्णतेचा झपाट्याने वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांत उष्ण लाटेचा तडाखा बसत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
विदर्भात उष्णतेची कमाल पातळी
आज विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमान ४४.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अमरावती, अकोला, नागपूर आणि वर्धा येथेही तापमान ४४ अंशांवर पोहोचले आहे. यवतमाळ आणि सोलापूरमध्ये ४३ अंश, तर गडचिरोली, शिर्डी, परभणी, गोंदिया आणि जळगावमध्ये ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे.
कोकण आणि मराठवाड्यात दमट हवामानामुळे अस्वस्थता
कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये दमट हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थतेचा अनुभव येत आहे. याठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता
उत्तर छत्तीसगड ते तामिळनाडूपर्यंत सक्रीय असलेल्या हवामान पट्ट्यामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याचा सल्ला
हवामान खात्याने नागरिकांना शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी प्यावे, अंग झाकणारे हलके कपडे घालावेत, आणि उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.