मित्रांनो यंदा अतितापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड वेगाने सुरू असून त्यामुळे अरबी समुद्राकडून दमट वारे राज्यात प्रवेश करत आहेत. याचा परिणाम म्हणून येत्या दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. विशेषता विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी २७ व २८ एप्रिल रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा संपूर्ण मार्च महिना आणि एप्रिलचे दिवस प्रचंड उकाड्याने भरलेले होते, सरासरी तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते, तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमान ४५ अंशांवर पोहोचले होते. अरबी समुद्राचे तापमानही ३१ अंशांवर पोहोचल्याने दमट वाऱ्यांचा जोर वाढला आहे.
त्यामुळे २६ ते २९ एप्रिल दरम्यान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. २६ एप्रिल रोजी ब्रह्मपुरीत ४५.५ अंश, चंद्रपूरात ४५.४ अंश, अकोल्यात ४५.१ अंश, अमरावतीत ४४.६ अंश, परभणीत ४४.४ अंश, नागपूर व वर्धा येथे अनुक्रमे ४४ आणि ४४.१ अंश तापमान नोंदले गेले.
याशिवाय यवतमाळ, वाशिम, जळगाव, पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, गोंदिया, मुंबई आणि रत्नागिरी या भागांतही उच्च तापमानाची नोंद झाली. एकंदरीत, विदर्भ आणि महाराष्ट्रात हवामानाचा मिजाज काहीसा बदलत असून नागरिकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.