मंडळी महागाईच्या वाढत्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे आरोग्य विमा असणे अत्यावश्यक झाले आहे. मात्र आजही भारतातील अनेक लोक आरोग्य विमा घेऊ शकत नाहीत, कारण विम्याचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ साली आयुष्मान भारत योजनेची सुरुवात केली.
या योजनेला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) असेही म्हणतात. ही योजना जगातील सर्वात मोठ्या सरकारी आरोग्य विमा योजनांपैकी एक मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड दिले जाते, ज्याद्वारे त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळू शकतात.
सप्टेंबर २०२४ मध्ये सरकारने या योजनेमध्ये एक महत्त्वाचा बदल केला. ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांना, त्यांच्या उत्पन्नाची अट न पाहता, या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आयुष्मान वय वंदन कार्ड जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता वृद्ध नागरिकांनाही मोठ्या आर्थिक मदतीसह मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ कोणत्या लोकांना मिळतो हे समजून घेणे आवश्यक आहे. ही योजना प्रामुख्याने गरीब व गरजू कुटुंबांसाठी आहे. आयकर भरणारे नागरिक, संघटित क्षेत्रातील कर्मचारी, ESICचे लाभार्थी किंवा जे लोक पीएफसाठी योगदान देतात, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सामाजिक-आर्थिक आणि जातीय जनगणना (SECC-2011) मध्ये ज्यांची नावे आहेत, अशी कुटुंबेच या योजनेसाठी पात्र मानली जातात.
ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणारे कुटुंब, ज्या कुटुंबात १६ ते ५९ वयोगटातील कोणताही प्रौढ पुरुष सदस्य नाही, अनुसूचित जाती आणि जमातीतील कुटुंबे तसेच भूमिहीन कामगार कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर शहरी भागात कचरा वेचणारे, घरकाम करणारे, बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते इत्यादी प्रकारचे काम करणाऱ्या कुटुंबांनाही याचा लाभ मिळतो.
जर तुम्हाला आयुष्मान कार्ड काढायचे असेल तर तुम्ही ऑनलाइन आपल्या पात्रतेची तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://pmjay.gov.in/ जावे लागेल. तेथे Am I Eligible या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरल्यावर तुम्ही पात्र आहात की नाही, याची माहिती तुम्हाला मिळेल.