मित्रांनो आर्थिक वर्ष २०२५ मध्ये शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अगदी दिग्गज कंपन्याही या अस्थिरतेच्या लाटेपासून स्वतःचं स्थान टिकवू शकलेल्या नाहीत. यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लालेतापले आहेत. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते – सोन्याचे दर सातत्याने नवे उच्चांक गाठत आहेत.
गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहता, सोन्याने यंदा म्युच्युअल फंडांनाही मागे टाकले आहे. वार्षिक परतावा सुमारे २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, देशांतर्गत बाजारात १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख रुपयांच्या उंबरठ्यावर उभी आहे. प्रश्न आहे – पुढे हा दर वाढणार की घटणार?
सोन्याचा रेकॉर्डब्रेक प्रवास
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ जून २०२५ रोजी एक्सपायरी असलेल्या सोन्याने इतिहास घडवला – ९५,९३५ रुपये प्रति १० ग्रॅम अशी उच्चांकी किंमत गाठली. फक्त एप्रिल महिन्यातच सोन्याचा दर तब्बल ५,००० रुपयांनी वाढला. १ एप्रिल रोजी तो ९०,८७५ रुपये, तर वर्षाच्या सुरुवातीला ७८,००० रुपयांच्या आसपास होता.
सोनं खरोखर लाखाच्या पुढे जाणार का?
दिल्लीतील सराफा बाजारात नुकतीच १० ग्रॅम सोन्याची किंमत ९८,००० रुपये पार झाली. याच वेगाने जर वाढ सुरू राहिली, तर १० ग्रॅम सोनं १ लाखाच्या पुढे जाणं काही आश्चर्यकारक ठरणार नाही.
देशांतर्गत बाजारातील वर्तमान दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर ९४,९१० रुपये, २२ कॅरेटचा ९२,६३० रुपये, तर २० कॅरेटचा ८४,४७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. १८ कॅरेट सोनं सध्या ७६,८८० रुपये दराने मिळत आहे. हे दर कर आणि मेकिंग चार्जशिवायचे असून, खरेदीवेळी GST आणि मेकिंग चार्ज वेगळे लागतात. IBJA चे दर देशभरात समान प्रमाणात मान्य केले जातात.
सोन्याचे दर वाढत का आहेत?
सोनं हे नेहमीच अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. सध्या जगभरात भू-राजकीय तणाव, व्यापारयुद्ध, आणि आर्थिक अनिश्चितता पसरलेली आहे. अमेरिकन डॉलरच्या घसरणीचा आणि जागतिक महागाईच्या भीतीचाही परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसून येतो. अमेरिका-चीन दरम्यानचा तणाव, ट्रम्प टॅरिफ्स आणि जागतिक शेअर बाजारातील गोंधळ यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळले आहेत.
सध्याच्या घडामोडी पाहता, सोन्याच्या किमतीत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर सोनं हे आजही एक मजबूत पर्याय ठरू शकतो.