Akola Information In Marathi पश्चिम विदर्भात वसलेला अकोला जिल्हा व त्याची ’काॅटन सिटी’ म्हणून असलेली ओळख अजूनही कायम आहे.
अकोला जिल्ह्याची संपूर्ण माहिती Akola District Information In Marathi
अकोला हा जिल्हा आदिम काळापासून विदर्भाचा भाग आहे.अकोला हे नाव तिथल्या अकोलसिंह यांच्या नावावरून पडले असावे असे त्यांच्या इतिहासात डोकावल्यास आपल्यास कळते.चला तर जाणुया अकोला शहर व त्या संपूर्ण जिल्ह्याची माहिती.
राजा अकोलसिंहने गावाचे रक्षण करण्याकरता या ठिकाणी मातीची मोठी भिंत उभारली होती. पण याला किल्ल्याचे स्वरूप औरंगजेब साम्राज्याचा नवाब असदखानाने प्राप्त करून दिले.
मुगल सम्राट औरंगजेबने अकोला हे गाव असदखानला बक्षीस म्हणून देण्यात आले होते. त्या काळी अकोल्याच्या चारही बाजुने मोठी भिंत बांधण्यात आली व त्याला चार मोठे दरवाजे ठेवण्यात आले व दहिहंडा वेस, बाळापुर वेस, अगरवेस आणि गजवेस अशी त्यांची नावं!
आज असदगड ह्या किल्याची दुरव्यवस्ता झाली असली तरी त्याच्या मजबुत भिंती आजही त्याच्या भक्कमपणाची साक्ष देत भुतकाळाचे स्मरण करून देत आहेत.
अत्यंत सुबक व मनमोहक शहीद स्तंभ 1857 च्या उठावाचे प्रतिक म्हणुन नगरपालीकेच्या वतीने बांधण्यात आला आहे, किल्ल्याच्या पूनर्निर्मिती व स्तंभ बांधण्यासाठी 20,951 मजुरांनी काम केल्याचे सांगण्यात येते.1957 साली सुरू झालेले हे कार्य 12 एप्रील 1959 ला पुर्ण झाले.
मोर्णा नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा किल्ला अकोला शहराचे ऐतिहासिक महत्व आणि वैभवाची साक्ष देतो. किल्ल्यावरून दिसणारा सुर्याेदय आणि सुर्यास्त मनाला सुखावणारा आहे.व त्यासाठी येथे बरेच पर्यटक दिसून येतात.
अकोला जिल्हयातील तालुके–
1) अकोला 2) बाळापुर 3) पातुर 4) बार्शिटाकळी 5) मुर्तीजापुर 6) अकोट 7) तेल्हारा
अकोला जिल्हयाविषयी काही उपयुक्त माहिती –
- अकोला जिल्हयाची लोकसंख्या ही जवळपास 18,13,906 इतकी आहे.
- अकोला जिल्हयाचे एकुण क्षेत्रफळ 5428 वर्ग कि.मी इतके आहे.
- 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे 938 इतके आहे.
- मुंबई हावडा राष्ट्रीय महामार्ग 6 या शहरातुन गेला आहे.
- अकोला जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण5 आहे.
- सर्वठिकाणी जनावरांना खाण्याकरता देण्यात येणारी ढेप हीच भाव एकमात्र फक्त अकोला जिल्ह्यात ठरवलं जातो.कापसाचे मोठया प्रमाणात उत्पादन या जिल्हयात घेतले जायचे. या शिवाय सोयाबिन, तुर, उडीद ही इतर पिकांचे उत्पादन देखील मोठया प्रमाणात या भागात होतात.
- अकोला हे शहर दोन भागात विभागल्या गेले आहे, मोर्णा नदीच्या एका बाजुला असलेले जुने शहर आणि दुसऱ्या भागात तयार झालेले नवे शहर.
- अकोल्यातला असदगढ किल्ला आणि जवळ असलेले बाळापुर किल्ला आणि नरनाळा किल्ला या शहराला जुना इतिहास असल्याची साक्ष देतात.
- शहराच्या उत्तरेला अमरावती जिल्हयातील अंजनगाव सुर्जी दर्यापुर हे तालुके पुर्वेकडे अमरावती दक्षिणेकडे वाशिम आणि पश्चिमेकडे बुलढाणा जिल्हा आहे. (1999 पर्यंत वाशिम हा अकोल्याचाच भाग होता)
- महान हे मोठे धरण असुन पूर्ण शहराला ह्याच नाडिक्सहव पाणी पुरवले जाते.
- वान हे मोठे धरण तेल्हारा तालुक्यात असून ते अगदी नैसर्गिक रित्या डोंगरांच्या मधी वसले आहे. या धरणाला तीन जिल्हयांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत अकोला, बुलढाणा आणि अमरावती.
- राजराजेश्वर हे महादेवाचे मंदीर शहराचे आराध्यदैवत असुन अतिशय प्राचीन अश्या या मंदीराला जागृत देवस्थान मानल्या जातं, बरेच अनुभव आणि आख्यायिका या मंदीराशी जोडल्या गेल्या आहेत.
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोल्याच्या वैभवात भर घालणारे विद्यापीठ कृषी संबंधी नवनवे संशोधनं करण्याकरता प्रसिध्द आहे व त्याचा विस्तीर्ण असा हिरवागार परिसर मनाला सुखावणारा आहे.
- या विद्यापीठा समोरच महाबीजची मोठी इमारत दिमाखात उभी आहे.
- सर्वोपचार रूग्णालय या जिल्हयातील शासकीय रूग्णालयामुळे रूग्णांची मोठया प्रमाणात गर्दी शहरात पहायला मिळते.
- अकोला शहरात खाजगी रुग्णालयांची संख्या जास्त व उपचार चांगले असल्याने दुरूनदुरून रूग्ण उपचाराकरता या ठिकाणी येतात.
- कॅन्सर चे मोठे रूग्णालय ’तुकाराम हाॅस्पीटल’ या नावाने शहरात सेवा प्रदान करत आहे.
- कोचिंग क्लासेस या शहरात मोठया प्रमाणात असल्याने शिक्षणाकरता आणि स्पर्धापरिक्षांच्या अभ्यासाकरता विद्यार्थी मोठया प्रमाणात इथे येत असतात.
- शासकिय वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अभियांत्रीकी महाविद्यालय या शहरात असल्याने दुरदुरचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाकरता येत असतात.
- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या शहरात असुन मोठेमोठे उद्योग या ठिकाणी उभारलेले आपल्याला आढळून येते.
- शहरात विमानतळ असुन लवकरच विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
- रेल्वेसेवा आणि बससेवा उपलब्ध असल्याने शहर मोठमोठया शहरांशी सहजतेने जोडल्या गेले आहे.
- अकोला शहरापासुन नागपुर 247 कि.मी. आणि मुंबई 568 कि.मी अंतरावर आहे.
- अकोला जिल्हा उन्हामुळे देखील ओळखला जातो, हिवाळा आणि पावसाळा हे जरी इथले सामान्य ऋतु असले तरी उन्हाळा मोठया प्रमाणात तापतो.
- अकोल्यात प्रत्येक श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी साजरा होणारा कावड उत्सव संपुर्ण भारतात फक्त अकोल्यात साजरा होतो. शहराबाहेरच्या 15 कि.मी. दुरवरून पायी चालत जाउन कावडधारी नदीचे पाणी आणुन राजराजेश्वराला जलाभिषेक करतात ही ह्या गावाची जुनी परंपरा असल्याचे कळून येते.
अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळ–
सालासार बालाजी मंदीर
अकोला शहरातील गंगा नगर भागात 2014 साली या मंदीराची निर्मीती करण्यात आली असुन अतिशय विस्तीर्ण परीसरात देखणे मंदीर भावीकांचे आणि पर्यटकांचे लक्ष वेधुन घेण्यात यशस्वी झाले आहे. मंदीरात हनुमानाची, श्रीराम दरबार, राधाकुष्णाची, आणि महादेवाची मुर्ती स्थापीत करण्यात आली असुन स्वच्छ आणि सुशोभीत केलेला परिसर पाहुन मनाला प्रसन्नता आणि शांतीचा लाभ मिळतो, समोरच हिरवळीचा बगीचा तयार केला असुन विविध रंगीबेरंगी कारंजे देखील आकर्षक आहेत. नित्य होत असलेली भजनं, धार्मीक कार्यक्रमांमुळे भक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.
अन्नपुर्णा माता मंदीर –
येथुन काही अंतरावर अन्नपुर्णा मातेचे मंदीर देखील पाहाण्यासारखे आहे.
राजराजेश्वर मंदीर –
अकोला शहरातील जुने शहर भागात असलेले हे मंदीर अकोला शहराचे ग्रामदैवत आहे. फार प्राचीन असा इतिहास या मंदीराला लाभलेला असुन महादेवाचे फार भव्य असे शिवलिंग या ठिकाणी आहे.
या मंदीराविषयी एक कहाणी सांगितली जाते ती अशी राजा अकोलसिंहाची पत्नी या महादेवाची निस्सिम भक्त होती ती भल्या पहाटे या शिवलिंगाचे दर्शन घेण्याकरता नियमीत या मंदीरात येत असे, राजा अकोलसिंहाला राणीवर संशय आल्याने त्याने एकदा तिचा पाठलाग केला राणी शिवलिंगाचे दर्शन घेत असल्याचे पाहुन राजा मनोमन खजील झाला पण संशय घेतल्याने राणी दुखावली गेली तिने राजेश्वराला स्वतःमधे सामावुन घेण्याविषयी साकडे घातले त्याचक्षणी पिंड दुंभगुन राणी त्यात गुप्त झाली, पुढे कित्येक दिवस राणीचे केस आणि साडीचा पदर शिवपिंडी बाहेर होते असे सांगण्यात येते.नित्य पुजेमुळे आज तो पदर जरी त्या ठिकाणी दिसत नसला तरी शिवपींडीला पडलेली भेग आजही पहायला मिळते असे म्हणतात.
प्रत्येक सोमवारी, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला राजराजेश्वराच्या दर्शनाकरता भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी या ठिकाणी पहायला मिळते.या शिवाय राणीसती मंदीर, रिझर्व माता, अक्कलकोट ची देवी ही देवीची मंदीर नवरात्रात भाविकांच्या गर्दीने ओसंडुन वाहात असतात.
पातुरची रेणुका माता–
अकोला शहरापासुन जवळपास 30 कि.मी. अंतरावर पातुर तालुक्यात उंच गडावर आई रेणुकेचे मंदीर आहे. जे भाविक माहुर ला जाउन रेणुका देवीचे दर्शन घेउ शकत नाही ते या ठिकाणी येउन दर्शनाचा लाभ घेतात. हिरव्यागार उंच गडावर आई रेणुकेचे हे मंदीर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. या गडावरून संपुर्ण पातुर चे मोरम्य दृश्य पहावयास मिळते.
जवळपास दोनशे ते 250 पाय.या चढुन मंदीरात दर्शनाकरता लोक येथे येतात,मंदीरात आल्यानंतर आई रेणुकेचा मुखवटा दृष्टीस पडतो आणि भाविक सर्व श्रम कष्ट विसरतात. पातुरला रेणुकामातेच्या दर्शनाला यावयाचे असल्यास अकोल्यावरून मोठया प्रमाणात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि खाजगी बसेस उपलब्ध आहेत शिवाय खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येते.
काटेपूर्णा अभयारण्य–
अकोला शहरापासुन 30 कि.मी. अंतरावर निसर्गाने वेढलेले आणि प्राकृतिक सौंदर्याचा परिसस्पर्श झालेले काटेपुर्णा अभयारण्य पशु पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. अनेक पक्षी आणि प्राणी इथे वास्तव्याला असुन निसर्गप्रेमी मोठया संख्येने इथे भेट देण्याकरता गर्दी करतात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि वृक्ष येथे असुन जवळपास 115 प्रकारच्या वनस्पती इथे आढळतात.
काटेपुर्णा अभयारण्य चार शिंगाच्या अॅंटीलोप आणि भुंकणाऱ्या हरणाकरता प्रसिध्द आहे. या व्यतिरीक्त काळे हरीण, कोल्हा, जंगली डुक्कर, ससा, निलगाय, जंगली मांजरी, मोर आणि माकड देखील आहेत. काटेपुर्णा जलाशयामुळे या ठिकाणी विविध प्रजातींचे पक्षी देखील आकर्षीत होतात.
नरनाळा किल्ला –
अकोल्यापासुन साधारण 65 कि.मी. अंतरावर नरनाळा किल्ला असुन यालाच शहानुर किल्ला देखील म्हंटल्या जातं. या किल्ल्याचे नाव राजपुत शासक नरनल सिंह यांच्या नावावरून ठेवण्यात आले. 15 व्या शतकात या किल्ल्यावर मोगलांनी कब्जा केला आणि याचे पुर्ननिर्माण केले त्यामुळे याला शहानुर किल्ला देखील म्हंटले जाते.
आज या किल्ल्याची दुरावस्था झाली असुन बऱ्याच गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तरीही बुलंद दरवाजा, येथील तोफ, किल्ला पाहण्यासाठी येथे बरेच पर्यटक गर्दी करतात. आजुबाजुला असलेले सृष्टीसौंदर्य पाण्याचे तलाव येथील निसर्गसौंदर्यात भर घालतात.
खटकाली, पोपटखेड येथील धरण ही देखील प्रेक्षणीय स्थळं असुन पाहाण्यासारखी आहेत वळणावळणाच्या या रस्त्यावर खाजगी वाहनाने येणे श्रेयस्कर ठरते.
वारी हनुमान –
तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान हे ठिकाण भाविकांकरता आणि पर्यटकांकरता आकर्षणाचा केंद्रबिंदु मानले जाते. रामदास स्वामींनी या ठिकाणी हनुमानाची मुर्ती स्थापीत केली असुन दुरून दुरून या ठिकाणी भाविक दर्शनाकरता आणि या निसर्गरम्य ठिकाणी काही वेळ घालवण्यासाठी येतात.
मंदीरा नजीक हनुमान सागर प्रकल्प नावाचे मोठे धरण असुन आसपासच्या परीसरातील सर्वात मोठे धरण म्हणुन प्रसीध्द आहे. डोंगरांच्या सान्निध्यात तयार झालेल्या या धरणातुन पावसाळयात पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर या मंदीराजवळचा परिसर अतिशय सुरेख दिसतो. या ठिकाणी भाविक मोठया प्रमाणात भंडारे आणि रोडगे करण्याकरता एकत्र येतात.
मामा भाच्चा नावाचा डोह या ठिकाणी असुन या ठिकाणी मामा आणि भाच्च्याने एकत्र अंघोळ करू नये असे मानल्या जाते. या ठिकाणी येण्याकरता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असुन खाजगी वाहनाने देखील या ठिकाणी पोहोचता येतं.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ –
महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ म्हणुन नावलौकीक मिळवलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर अकोला शहराचे वैभव आहे. 20 ऑक्टोबर 1969 ला या कृषी विद्यापीठाची अकोल्यात स्थापना झाली.
संशोधनं, कृषी शिक्षण, शिक्षण विस्तार, अनुसंधान अश्या जवाबदा.या कृषी विद्यापीठ आज पार पाडत आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपुर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे विदर्भातील 11 जिल्हे कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.
कृषी विद्यापीठाचे नागपुर येथे एक केंद्र असुन गडचिरोली येथे नुकतेच एक केंद्र स्थापीत झाले आहे.
विद्यापीठ परिसर फार विस्तीर्ण असुन हिरवळीने नटलेला आहे. मोर, ससे, विविध सापांच्या प्रजाती, हरीण येथे नेहमी पहायला मिळतात.
इथली हवा शुध्द आणि प्रदुषणरहीत असल्याने सकाळच्या वेळेस माॅर्निंग वाॅक करण्याकरता शेकडो नागरिक इथे येतात.