सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Satara Information In Marathi

Satara Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण सातारा या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.सातारा जिल्हा म्हणजे शूरांची आणि वीरांची कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि युग पुरुष म्हणून समाज ज्यांच्याकडे पहातो त्या थोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद सर्शाने पावन झालेला हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसला आहे.

Satara Information In Marathi

सातारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Satara Information In Marathi

उज्ज्वल परंपरा, देदिप्यमान इतिहास आणि थोर पराक्रमाची पार्श्वभूमी लाभलेल्या ह्या जिल्हयात महान साधूसंत आणि थोर ज्ञानी पुरुषही होउुन गेले. सुमारे नऊ लक्ष चौरस मैलांच्या प्रदेशावर सत्ता चालविणाऱ्या मराठी साम्राज्याची सातारा ही एके काळी राजधानी होती. हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आहे.

सातारा जिल्ह्याचे मुख्यालय सातारा येथे आहे. त्याला ऐतिहासिक,सामाजिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यात सातारा जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा होता. या जिल्ह्यातील तरुण उत्साहाने सैन्यात जाऊन देशसेवा करतात. ही परंपरा आजही कायम आहे.

सातारा जिल्ह्याचे नामकरण

जिल्ह्याला सातारा हे नाव कसे पडले याबाबत अनेक मते आहेत. साताऱ्याच्या दक्षिणेस साते नावाचे गाव आहे. त्याच्या जवळच्या दऱ्यास सातदरा असे म्हणतात. या सातदरा शब्दावरुन सातारा अशी उत्पत्ती झाल असावी.

अजिंक्यताऱ्याचे जुने नाव सप्तर्षीचा किल्ला असे होते. या सप्तर्षीपासून सातारा नाव पडल्याचेही सांगितले जाते. सातर शब्दाचा अर्थ ईशान्य असा आहे.

भोज राजाची राजधानी पन्हाळगड येथे होती. पन्हाळगडाच्या इशान्येस असलेले पूर्वीचे गाव सातर व त्यावरुन सातारा शब्द बनला असावा. औरंगजेबाचा मुलगा अजिमशहा याने सातारच्या किल्ल्याला वेढा दिला तेव्हा किल्ल्याला सतरा दरवाजे व बुरुज होते, यावरुनही सातारा नाव पडले असावे असे अनेक मतप्रवाह सातारा नावाच्या बाबतीत प्रचलित आहेत.

सातारा जिल्ह्याचा इतिहास

या जिल्ह्यावर पूर्वी मौर्य, सातवाहन यांच्यानंतर काही शतके मुस्लीम राज्यकर्त्यांनीही राज्य केले. सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी सातारा आपल्या ताब्यात घेतला. राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने घेतलेला सातारा परशुराम पंतप्रतिनिधींनी पुन्हा मिळविला.

इ. स. १६९८ साली छत्रपती राजारामांनी साताऱ्याला राजगादीची स्थापना केली. राजारामाच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी साताऱ्यातून छत्रपतींची गादी सांभाळली. पुढे औरंगजेबाने शाहुंची सुटका केल्यानंतर साताऱ्यावर शाहुंच्या पक्षाची सत्ता प्रस्थापित झाली.

ताराबाईंनी कोल्हापुरात स्वतंत्र गादी स्थापन केली. मराठा काळात सातारा प्रदेशात मोठे सरदार उदयास आले होते. यामध्ये जावळीचे चंद्रराव मोरे, मलवडीचे घाटगे, फलटणचे निंबाळकर, कापशीचे घोरपडे इत्यादी प्रमुख होते. इंग्रज कालखंडात साताऱ्याच्या गादीच्या संरक्षणासाठी रंगो बापूजी इंग्लंडमध्ये गेले.

इ. स. १८४९ साली दत्तक विधान नामंजूर करीत इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा केले. रंगो बापुजींनी १९५७ पर्यंत इंग्रजांविरुद्ध लढा दिला व ते कधीही इंग्रजांच्या हाती आले नाहीत.

छोडो भारत चळवळीत जिल्ह्याचे मोठे योगदान होते. क्रांतीसिंह नाना पाटलांचे प्रतिसरकार येथेच स्थापन झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्हा दक्षिणेकडील वारणा नदीपासून ते उत्तरेकडील नीरा नदीपर्यंत पसरला होता.

स्वातंत्र्यानंतर प्रशासकीय कामकाज आणि सोयीच्या दृष्टीने सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा अशा दोन जिल्ह्यांची निर्मिती झाली. पुढे दक्षिण सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्हा तयार झाला तर उत्तर सातारा जिल्ह्यातून सध्याचा सातारा जिल्हा उदयास आला.

सातारा जिल्ह्याला सैनिकांचा जिल्हा म्हटले जाते. आजही सेना दलात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील जवान देशाच्या सीमेवर देशाची सेवा बजावित आहेत. सातारा येथे सैनिक स्कूलची स्थापना २३, जून १९६१ मध्ये करण्यात आली.

सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना

सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर हे शेजारील जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्याच्या उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेस व अग्नियेस सांगली जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, वायव्येस (उत्तर-पश्चिमेस) रायगड जिल्हा आहे. जिल्ह्याचा विस्तार उत्तरेला १७.५ ते १८.११ अक्षांस आणि पूर्वेला ७३.३३ ते ७४.५४ रेखांश असा आहे.

सातारा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १० हजार ४८४ चौ. कि. मी. आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३.४१ क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्याला आले आहे. आकारमानाच्या दृष्टीने राज्यातील एकुण ३६ जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा १२ वा क्रमांक लागतो.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगा आहेत. त्याच्या पूर्वेला बामणोलीचा डोंगर दक्षिणोत्तर दिशेस पसरलेला आहे. याशिवाय जिल्ह्यात महादेव डोंगर, सिताबाई, औंध, आगाशिवा इत्यादी डोंगर आहेत. या डोंगराच्या दरम्यान कृष्णा नदीचा सखल मैदानी भाग आहे.

जिल्ह्याची उत्तर सीमा निरा नदीने सिमीत केली आहे. जिल्ह्यामध्ये मांढरदेव व शिंगणापूर ही प्रसिद्ध शिखरे आहेत तसेच महाबळेश्वर व पाचगणीचे पठारही याच जिल्ह्यात आहेत. महाबळेश्वर हे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असून समुद्र सपाटीपासून सरासरी उंची १४३६ मीटर आहे.

सातारा जिल्ह्यातील नद्या

सातारा जिल्ह्यात कृष्णा व कोयना या प्रमुख नद्या आहेत. याशिवाय माण, येरळा, वसना, बाणगंगा या नद्या आहेत. नीरा आणि माण या भीमा नदीच्या उपनद्या आहेत.

महाबळेश्वर पठाराच्या पूर्व भागात समुद्रसपाटीपासून साधारणतः १ हजार ३७१ मीटर उंचीवर कृष्णा नदी उगम पावते. या नदीचा जवळपास १७२ किलोमीटचा प्रवास सातारा जिल्ह्यातून होतो. कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोयना असून ती कोयना नदीही महाबळेश्वर पठारावर उगम पावते.

कृष्णा नदीच्या कोयना, उरमोडी, वेण्णा, कुडाळी या उपनद्या आहेत. कराड येथे कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम झाला आहे. या ठिकाणास ‘प्रितीसंगम’ असे म्हणतात. कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम साताराजवळ माहुली येथे झाला आहे.

कोयना नदी महाबळेश्वर पठारावर उगम पावते. ही नदी जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाटण, मेढा व क-हाड तालुक्यातून वाहत जाऊन प्रितीसंगम येथे कृष्णा नदीस मिळते. या नदीवर पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. कैरा व वांग या कोयनेच्या उपनद्या आहेत.

सातारा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून निरा नदी वाहते. बाणगंगा ही निरा नदीची उपनदी आहे.

माणगंगा ही नदी दहिवडी तालुक्यातून वाहत जाऊन सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. या नदीवर रानंद तलाव व म्हसवड तलाव आहेत.

सातारा जिल्ह्याची राजकीय संरचना

सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. ते पुढीलप्रमाणे : सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा.

या तालुक्यामधील जावळी तालुक्याचे मुख्यालय मेढे हे आहे, माण तालुक्याचे मुख्य ठिकाण दहिवडी हे आहे आणि खटाव तालुक्याचे मुख्य ठिकाण वडूज हे आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा तालुका माण व क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका महाबळेश्वर हा आहे.

सातारा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतो. या जिल्ह्याचा प्राकृतिक विभाग पश्चिम महाराष्ट्र आहे. जिल्ह्यामध्ये १ हजार ७४५ गावे, १ हजार ५०२ ग्रामपंचायती, ११ तालुके, ११ पंचायत समित्या, ८ नगरपालिका, ८ नगरपंचायती, ७ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्यात सातारा व माढा २ लोकसभा मतदार संघव ८ विधानसभा मतदार संघ आहेत. जिल्ह्याचा आरटीओ वाहन नोंदणी क्रमांक एमएच – ११ आहे.

लोकसंख्या

सन २०११ च्या जनगणनेनुसार सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३०,०३,७४१ इतकी आहे. यामध्ये स्त्रियांची संख्या १४, ९२, ८९९ (४९.७०%) तर पुरुषांची संख्या १५,१०,८४३ (५०.३०%) इतकी आहे.

या जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२%, लोकसंख्येची घनता २८७ चौ. कि. मी. आणि लिंग गुणोत्तर ९८८ इतके आहे. या जिल्ह्यातील अनुसूचित जातीची लोकसंख्या ३ लाख २३ हजार २३६ इतकी तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २९ हजार ६३५ इतकी आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात भिल्ल, कातकरी हे आदिवासी राहतात. कृष्णा, कोयना नद्यांच्या उगमाकडील भागात यांच्या वस्त्या जास्त प्रमाणात आढळतात.या जिल्ह्यात ग्रामीण, शहरी व आदिवासी लोकजीवन पाहायला मिळते.

हवामान

सातारा जिल्ह्याचे हवामान साधारणत: उष्ण व कोरडे आहे. सह्याद्री पर्वत व इतर डोंगरांमुळे जिल्ह्याचा पश्चिम भाग जास्त उंचीचा डोंगराळ आहे. येथील हवामान थंड असते. याच भागात महाबळेश्वर, पाचगणी यासारखी थंड हवेची ठिकाणे आहेत.

जिल्ह्याच्या पूर्व भागात तापमान जास्त असते. पूर्वेकडील काही भुभाग हा खुरट्या झुडपांनी व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील उंच भाग डोंगराळ व वनाच्छादीत असल्यामुळे ढग अडवले जाऊन येथे पाऊस पडतो.

येथील महाबळेश्वर सारख्या ठिकाणी ६०० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे तर पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. यामध्ये माण, खटाव यासारख्या तालुक्यांच्या समावेश होतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते.

सातारा जिल्ह्यातील खनिज संपत्ती

या जिल्ह्यात खनिज संपत्ती अत्यल्प प्रमाणात आढळून येते. यात बॉक्साईट, चुनखडी व मँगनीज मिळते. तसेच जांभा खडक व नदीपात्रातील वाळू बांधकामासाठी काढली जाते.

मृदा व जमीन

जिल्ह्यातील जमिनीच्या प्रतवारीत प्रादेशिक भिन्नता आढळते. महाबळेश्वर तालुक्यात तसेच वाई, जावळी व पाटण तालुक्यांच्या पश्चिम भागात जांभी मृदा आढळते. डोंगर उतारावरील मृदेच्या थराची जाडी कमी आहे .

परंतु पावसामुळे डोंगराळ भागातून वाहत आलेल्या वनस्पतीजन्य पालापाचोळ्यामुळे व गाळामुळे नैसर्गिक अथवा कृत्रिम रीत्या तयार केलेल्या खाचरांमध्ये सुपीक मृदा तयार झाल्या आहेत. कृष्णा, वेण्णा, कुडाळी, कोयनाव केरा नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या सततच्या संचयनामुळे जाड थर असलेल्या सुपीक मृदा आहेत.

जिल्ह्याच्या मध्य भागात गाळाची तसेच बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा आढळते. कृष्णा खोऱ्यातील मृदा ही दख्खनच्या पठारावरील विशेष सुपीक मृदा समजली जाते. त्यांपैकी सातारा व कराड तालुक्यांतील कृष्णा काठच्या जमिनी अत्यंत सुपीक आहेत.

नीरा व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यातील मृदा चांगल्या प्रतीची आहे. खंडाळा, फलटण व खटाव तालुक्यांच्या डोंगरी परिसरातील मृदा हलकी व खडकाळ आहे. माण तालुक्यातील जमिनीची प्रत अत्यंतनि कृष्ट आहे. ओढे, नाले यांच्या दरम्यान माळरानाचे पट्टे आढळतात.

सातारा जिल्ह्यातील शेती

जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी १३% क्षेत्र वनांखाली, ६.९९% चराऊ कुरणांखाली, २.६१% बिगर शेतीसाठी, ४% क्षेत्र लागवडीलायक पण पडीक जमिनीचे आहे.

सातारा जिल्हा कृषिप्रधान असून येथे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांतील पिके घेतली जातात. बाजरी, तांदूळ, भुईमूग, घेवडा ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके असून, गहू व हरभरा ही रब्बी पिके आहेत. ज्वारीचे पीक दोन्ही हंगामांत घेतले जाते.

कराड, खटाव, सातारा व पाटण या तालुक्यांत खरीप संकरित ज्वारीचे, तर फलटण, सातारा, वाई, कोरेगाव व खंडाळा या तालुक्यांत रब्बी ज्वारीचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. पाटण, कराड, जावळी, महाबळेश्वर हे तालुके तांदळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्घ आहेत.

माण, खटाव, खंडाळा, फलटण व कोरेगाव तालुक्यांतील कमी पावसाच्या पदेशांत बाजरीचे पीक घेतले जाते. फलटण, खटाव व जावळी हे तालुके गव्हाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. सातारा, कराड, पाटण, जावळी, वाई व कोरेगाव या तालुक्यांमध्ये भुईमूग अधिक प्रमाणात पिकविला जातो. हरभऱ्यांचे उत्पादन सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात घेतले जाते.

फलटण तालुक्यात द्राक्षे व डाळिंबाच्या बागा आहेत. कराड तालुक्यात थोड्या फार प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. कोरेगाव व खटाव हे तालुके बटाट्या च्या तर माण,फलटण व खंडाळा हे तालुके कांद्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. कृष्णाकाठची वांगी प्रसिद्घ आहेत.

ऊस हे प्रमुख नगदी पीक आहे. हळद, आले ही पिकेही येथे घेतली जातात.मेंढीपालन हा माण, खटाव, फलटण आणि खंडाळा या कमी पावसाच्या तालुक्यातील एक प्रमुख कृषिपूरक व्यवसाय आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसायास महत्त्व प्राप्त झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील उद्योगधंदे

औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याची वाटचाल चालू आहे. सातारा, कराड, फलटण, वाई येथे औद्योगिक वसाहती आहेत.

कराड, सातारा, फलटण, कोरेगाव व वाई या तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकरित गाई पाळण्याच्या व्यवसायाकडे वळले आहेत. दूध संकलनासाठी दुग्धव्यवसाय सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत.

सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कूपर कंपनीचा डीझेल एंजिन निर्मितीचा देशातील पहिला कारखाना असून याच तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामग्री निर्मितीचा कारखाना आहे.

युनिव्हर्सल लगेज या कंपनीचा बॅगा बनविण्याचा उद्योग ही सातारा येथे आहे. कराड येथे किर्लोस्कर बदर्सचा हेमेटिक सील्ड कॉम्प्रेसर हाइड्रोलिक प्रॉडक्ट कारखाना आहे.

पाटण तालुक्यात दौलतनगर, कराड तालुक्यात रेठरे बुद्रुक (शिवनगर), यशवंतनगर व शेवाळेवाडी येथे, तर वाई तालुक्यात किसन वीर नगर (जांब), फलटण तालुक्यात फलटण येथे, सातारा तालुक्यात शेंद्रे (शाहूनगर), जावळी तालुक्यात कुडाळजवळ असे जिल्ह्यात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने आहेत.

याशिवाय फलटण तालुक्यात साखरवाडी व कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाने आहेत.याशिवाय फलटण तालुक्यात साखरवाडी व कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर येथे खाजगी क्षेत्रातील साखर कारखाने आहेत.

जिल्ह्यातील सातारा तालुक्यात जरंडेश्वर येथे भारत फोर्ज कंपनीचा लोखंडी सामानाचा कारखाना आहे. सातारा तालुक्यात सातारा रोड येथे कूपर कंपनीचा ऑईल इंजिनचा कारखाना आहे.

सातारा येथे मोटार, स्कूटर, सूटकेस, वाहनांचे सुटे भाग, खेळणी इत्यादी वस्तू तयार केल्या जातात. महाबळेश्वर, पाचगणी व वाई येथे फळप्रक्रिया उद्योग आहेत. सातारा तालुक्यात ठोसेघर, चाळकेवाडी तसेच पाटण तालुक्यातील मल्हारपेठ व खटाजवळ उंच पठारावर वाऱ्याच्या सहाय्याने वीजनिर्मिती केली जाते.

सातारा या जिल्ह्यात मध गोळा करणे, तेल काढणे, गूळ तयार करणे, हातामागावर कापड विणणे हे लघुउद्योग केले जातात. याचबरोबर पूर्व भागात घायतापासून दोरखंड करणे, घोंगड्या विणणे, बुरूडकाम हे कुटीरोद्योग केले जातात.

महाबळेश्वर, पाचगणी येथील मधमाश्या पाळण्याचा व त्यापासून मध मिळविण्याचा उद्योग महत्त्वाचा आहे. कातडी कमावणे, मातीची भांडी बनवणे, लोणची-पापड तयार करणे इत्यादी कुटिरोद्योगही केले जातात.

सातारा जिल्ह्यातील वाहतूक व दळणवळण

या जिल्ह्यातील वाहतूक मुख्यतः रस्ते व लोहमार्गाने केली जाते. सातारा जिल्ह्यातून मुंबई-बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जातो.

या महामार्गावर शिरवळ, खंडाळा, पाचवड, सातारा, उंब्रज, कराड ही महत्त्वाची सातारा जिल्ह्यातील ठिकाणे आहेत. याशिवाय पुणे-बंगळूर हा एकमेव लोहमार्ग जिल्ह्यातून जातो. सातारा व कराड ही महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. कोयना व धोम धरणाच्या जलाशयांभोवतीच्या गावांना वाहतुकीसाठी यांत्रिक होड्यांची सोय केली आहे.

सातारा जिल्ह्यातील वनसंपदा

या जिल्ह्यामध्ये एकूण वनक्षेत्र १, ५९२.३५ चौ. कि. मी. इतके आहे. या जिल्ह्यात मुख्यतः पश्चिमेकडील सह्याद्री पर्वत आणि डोंगररांगांमध्ये वने आहेत. या वनांत साग, धावडा, बांबू, जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात.

या वनांतून बांधकामासाठी व इंधनसाठी लाकडे, आवळा, बेहेडा, हिरडा, अडुळसा, मध, डिंक इत्यादी उत्पादने मिळतात. त्याचबरोबरीने ससा, वानर, बिबटे, अस्वल, रानमांजर इत्यादी प्राणी आढळतात.

कोयना नदीच्या खोऱ्यात पाटण व जावळी या तालुक्यात सुमारे ४२३.५५ चौ. कि. मी. क्षेत्रावर कोयना अभयारण्य पसरलेले आहे. मायणीच्या तलावातील क्षेत्र पक्ष अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी रोहीत, बदके, बगळे, माळढोक इत्यादी पक्षी येतात.

महाबळेश्वर येथे प्रतापसिंह वनोद्यान आहे. तसेच प्रतापगड येथेही एक वनोद्यान उभारण्यात आले आहे. जागतिक वारसा यादीमध्ये युनेस्कोने सन २०१२ मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश केलेला आहे.

सातारा जिल्ह्यातील सण व उत्सव

सण, उत्सव, पारंपरिक लोककलांचा वापर करून मनोरंजन केले जाते. माण तालुक्यात गजे (लेझीम) ही लोककला प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य समाज ग्रामीण भागात राहतो. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. बेंदूर, दसरा, दिवाळी, इत्यादी सण साजरे करतात. सणासुदीला लोकगीते, लेझीम यातून मनोरंजन केले जाते.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, प्रतापगडावरील शिवप्रतापदिन, शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा, मांढरदेवीची यात्रा, पालीची खंडोबा यात्रा, औंधची यमाई यात्रा, म्हसवडची सिद्धनाथ यात्रा, सज्जनगडचा दासनवमी उत्सव इत्यादी सण व उत्सव साजरे केले जातात.शिवप्रतापाला वंदना म्हणून किल्ले प्रतापगडावर ‘शिवप्रतापदिन’ जिल्हा प्रशासनाच्यावतीने साजरा करण्यात येतो.

सातारा जिल्ह्यातील पर्यटन

सातारा हे ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे जलमंदिर, अजिंक्यतारा किल्ला, चारभिंती, हुतात्मा स्मारक, नटराज मंदिर, छत्रपती वस्तुसंग्रहालय इत्यादी उल्लेखनिय स्थळे आहेत, शहरापासून जवळच सज्जनगड हा किल्ला आहे.

कास तलाव, ठोसेघर ही सहलीची ठिकाणे आहेत. महाबळेश्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. कास पठारावर फुलांचा हंगाम पाहण्यासाठी पर्यटक आवर्जुन गर्दी करत असतात.

वाई हे शहर गणपती मंदिर व घाटांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे. कराड हे कृष्णाकोयनेच्या संगमावर आहे. येथे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे.

त्याचबरोबरीने ठोसेघर, ओझर्डे व भांबवलीचे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झालेली असते. चांदोली, कोयना ही अभयारण्ये व मायणी तलाव हे पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

चाळकेवाडी, ठोसेघर, खटाव व मल्हारपेठ या ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्प आहेत. वेण्णा नदीवर कन्हेर धरण, धावडशी येथील ब्रह्मेद्र स्वामींची समाधी, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामींची समाधी, लिंब येथील बारा मोटीची विहिर इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. सजनगड, प्रतापगड व अजिंक्यतारा हे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले आहेत. फलटण व चाफळ येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहेत.

पाली येथील खंडोबाचे देवस्थान, औंध येथील यमाई मंदिर, राजावाडा व वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. शिंगणापूर येथे शंभुमहादेवाचे मंदिर असून या ठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र शासनाने अलिकडेच ‘भिलार’ हे पुस्तकांचे गाव जाहीर केलेले आहे. यामुळे पर्यटक या भागाकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

सातारा जिल्ह्यातील किल्ले

सजनगड, प्रतापगड व अजिंक्यतारा हे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले आहेत.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

सातारा जिल्ह्याची निर्मिती कधी झाली?

सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता.

सातारा हे नाव कसे पडले?

सातारा हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमाजवळ वसलेले आहे. हे शहर 16 व्या शतकात स्थापन झाले आणि मराठा साम्राज्याचे छत्रपती, प्रथम शाहू यांचे सिंहासन होते. शहराच्या आसपास असलेल्या सात किल्ल्यांवरून (सात-तारा) शहराच नाव पडले.

साताऱ्यात कोणते फळ प्रसिद्ध आहे?

आंबा हे साताऱ्यातील प्रसिद्ध फळ आहे. आंबा व्यतिरिक्त पेरू उत्पादनासाठी देखील ओळखले जाते.

सातारा हे नाव कसे पडले?

सातारा हे शहर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमाजवळ वसलेले आहे. हे शहर 16 व्या शतकात स्थापन झाले आणि मराठा साम्राज्याचे छत्रपती, प्रथम शाहू यांचे सिंहासन होते. शहराच्या आसपास असलेल्या सात किल्ल्यांवरून (सात-तारा) शहराचे नाव पडले.

साताऱ्याला राजधानी का म्हणतात?

सातारा ही मराठा प्रांताची राजधानी म्हणून विकसित झाली. मराठा साम्राज्य हे उल्लेखनीय होते की ते जातिव्यवस्थेला चिकटलेले नव्हते. स्थापनेपासूनच, मराठा साम्राज्याच्या व्यवस्थापनात अनेक प्रतिभावान लोकांना आणले गेले ज्यामुळे ते सर्वात सामाजिकदृष्ट्या मोबाइल प्रशासनांपैकी एक बनले.

Leave a Comment