Gadchiroli Information In Marathi आज आपण अश्या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत जो आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो ,तो म्हणजे गडचिरोली जिल्हा.हा जिल्हा अतिदुर्गम, डोंगर द-याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त जागा ही जंगलाने व्यापलेली दिसून येते. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास ७६ % टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे.
गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Gadchiroli Information In Marathi
गडचिरोली जिल्हा २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला होता. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते.
गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त असल्याचे आपल्याला कळते. जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल समर्थक लोक आश्रय घेतात.जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१2 चौ.कि.मी आहे.
इतिहास
फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्कूट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य वंशाचे व नंतर देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. यानंतर गडचिरोलीवर गोंड यांचे राज्य आले.
तेराव्या शतकात, खंडक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. यानंतर खंडक्या बल्लाळ याच काळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला.
१८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) प्रदेशाचा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशामधला स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला.
ब्रिटिशांनी १९०५ मध्ये चंद्रपूरमधील व ब्रह्मपुरीमधील जमीनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तालुक्याची निर्मिती केली.
राज्याची पुनर्रचना होण्यापूर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, त्यांत चंद्रपूर हा जिल्हा समाविष्ट झाला.
१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र गडचिरोली जिल्हा हा भारताच्या ५५६ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. वैनगंगा नदीला सीमारेषा मानून चंद्रपूर (पूर्वीचे चांदा) जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले होते.
भूगोल
जिल्ह्याच्या ईशान्य भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा हे तालुके असून ते घनदाट जंगलाने व्यापलेले आहेत. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, मागासलेला, डोंगरदऱ्यांनी व घनदाट जंगलाने व्याप्त असून अविकसित समजला जातो. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेस भंडारा जिल्हा, पूर्वेस छत्तीसगड राज्य, दक्षिणेस व काहीसा नैऋृत्तेस आंध्रप्रदेश राज्य, पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.
या जिल्ह्याचा भाग डेक्कन प्लेट्यू क्षेत्रात येतो. गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व सीमेला दुर्ग, राजनांदगाव हे छत्तीसगड राज्यातील जिल्हे, पश्चिमेला चंद्रपूर जिल्हा, उत्तरेस भंडारा जिल्हा व दक्षिणेस अंध्राप्रदेश मधील अदिलाबाद, करीमनगर जिल्हे व छत्तीसगड मधील जगदलपूर जिल्हा आहेत.
पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून तिच्या दक्षिण तीरावर हा जिल्हा वसलेला आहे. प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या नद्यांच्या संगमाने बनलेली नदी) व इंद्रावती ह्या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात.
स्थापना
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे.
लोकसंख्या
एकुण लोकसंख्या 10,72,942
जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १,०८,८२४ एवढी असून तिची एकूण टक्केवारी ११.२ होते. आदिवासी जमातींच्या लोकांची संख्या ३,७१,६९६ एवढी असून त्यांचे प्रमाण जिल्ह्यात जास्त आहे. त्यांची टक्केवारी ३८.३० एवढी आहे.
जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी ३८ टक्के लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची असल्याने हा जिल्हा महाराष्ट्रातला आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनुसूचित जमातीमध्ये मुख्यत्वे गोंड, कोलाम, माडिया, परधान इत्यादी जमातीचे लोक आहेत.
जिल्ह्याचे मुख्यालय गडचिरोली येथे वसलेले असून हा जिल्हा नागपूरपासून १८० कि.मी. एवढया अंतरावर आहे. गडचिरोली जिल्हा चंद्रपूर पासून ८० कि.मी. अंतरावर आहे. सदर जिल्हा वैनगंगा, गोदावरी व इंद्रावती या मोठ्या नद्यांनी अनुक्रमे पश्चिम, दक्षिण व पूर्व दिशेने वेढलेला आहे.
हवामान
गडचिरोली जिल्ह्याचे हवामान उन्हाळ्यात खूप उष्ण तर हिवाळ्यात खूप थंड असते. जिल्ह्याची सरासरी आर्द्रता ६२ टक्के आहे.जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २० मे १९९२ रोजीला सर्वात जास्त ४६.३ अंश.से. एवढे व ५ जानेवारी १९९२ रोजी सर्वात कमी ५.० अंश से. एवढे तापमान नोंदले गेले आहे.
गडचिरोली जिल्हयात एकुण 12 तालुके आहेत
गडचिरोली,आहेरी,आरमोरी,भामरागड,चामोर्शी,देसाईगंज,धानोरा,एटापल्ली,कोर्ची, कुरखेडा,मुलचेरा,सिरोंचा
नद्या व धरणे
या जिल्ह्यात इंद्रावती, वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी या प्रमुख नद्या असून आढवी, खोब्रागडी, काठाणी, सिवनी, पोर व दार्शनी या अन्य नद्या जिल्ह्यातून वाहतात. वर्धा व वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता’ असे म्हणतात.
प्राणहिता नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. या जिल्ह्यात दिना नदीवरचे दीना धरण, पोटफोडी नदीवरचे कारवाफा व खोब्रागडी नदीचे तुलतुली धरण ही मुख्य धरणे आहेत.
प्रमुख पिके
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक भात असून,गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा व धानोरा हे तालकेभाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्यात ऊस, तंबाखू व शिंगाड्याचे उत्पादनही घेतले जाते.
जिल्हाला एकाच मोठी बाजार पेठ आहे, ती वडसा(देसाईगंज) येथे भरते. वडसा हे शहर वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले असून, जिल्ह्यातील एकमेव रेल्वे लाईन (गोंदिया-नागभीड-चंद्रपूर) येथून जाते. त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ आहे.
वनक्षेत्र
गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तीन चतुर्थांशापेक्षा अधिक प्रदेश घनदाट अशा जंगलांनी व्यापलेला आहे. या जिल्ह्याच्या एकूण जमिनींपैकी ७५.९६ % क्षेत्र वनांखाली आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण आणि वनाखाली असलेले एकूण क्षेत्र, या दोन्ही दृष्टिकोनातून या जिल्ह्याचा राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.
लोकजीवन
जिल्ह्यातील आदिवासीची विशिष्ट अशी संस्कृती आहे. येथील आदिवासी लोकांचे “पेरसा पेन” हे दैवत आहे. ही लोक शुभकार्यप्रसंगी किवा पिकांचे उत्पादन झाल्यावर “रेला” नावाचे नृत्य करून आनंद व्यक्त करतात.
” ढोल ” हे सुद्धा त्यांचे आवडीचे नृत्य आहे. होळी, दसरा व दिवाळी हे त्यांचे मुख्य सण आहेत. आदिवासी जमात ही मुख्यतः जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वास्तव्य करून आहे.
जिल्ह्यातील इतर जातीतील लोक त्यांचे गणपती, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी सण साजरे करतात. जिल्ह्याच्या काही भागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध “नाटक, तमाशा” इत्यादी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे दिवाळी ते होळी या कालावधीत झाडीपट्टीतील भागात आयोजन केल्या जाते या मुळे झाडीपट्टी नाटकासाठी वडसा हे तालुका ठिकाण प्रसिद्ध आहे गणपती, दसरा, होळी या सणाचे वेळी तसेच शंकरपटाच्या निमित्ताने आयोजन होते.
उद्योग
जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिलचा कारखाना असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरण्यांची संख्या जास्त आहे.
भातसडीचे उद्योग व कागद कारखाने जिल्ह्यात आहेत पण मोठे उद्योग नाहीत. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेचे स्टेशन आहे.
व्यवसाय
हा जिल्हा बांबूची झाडे व तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
दळणवळणः
गडचिरोली जिल्ह्यामधून, सिरोंचा येथून निझामाबाद-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही रेल्वे स्थानक नाही.
खनिजे संपत्ती :
गडचिरोली जिल्हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने अतिशय संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्यात लोह, चुनखडी, दगडी कोळसा व तांबे ही खनिजे प्रामुख्याने सापडतात. सुरजागड, भामरागड, दमकोट, गडचिरोली, देऊळगाव परिसर लोहखनिजासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
चामोर्शीजवळ मारोडा, रेगडी, शिरकाटोला येथे तांब्याचे साठे आढळतात. तसेच सिरोंचा तालुक्यात चुनखडीचे साठे आहेत. गडचिरोली तालुक्यात कठाणी नदीपरिसरात दगडी उद्योगविरहित कोळशाचे साठे आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख स्थळे:
हेमलकसा–
अपंग व कुष्टरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनाकरिता बाबा आमटे व त्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांनी एक प्रकल्प सुरु केला आहे.
सिरोंचा–
येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वणी यात्रा भरते.
आरमोरी–
या गावात त्रिदल पध्दतीचे शैव मंदिर आहे. हे मंदिर गोंड राजा हरीश्र्चंद्राने बांधले जो वैरागडचा किल्लेदार होता. नंतर हा भाग रघुजी भोसलेच्या ताब्यात गेला.
शोधग्राम–
डॉ. अभय बंग व त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग यांचे येथे आरोग्य केंद्र आहे.
वैरागड–
खोब्रागडी व सातनाला नद्यांच्या संगमावर आरमोरी तालुक्यात हा प्रसिध्द किल्ला आहे. विराट राजाची ही राजधानी . हा किल्ला राजा बाबाजी बल्लार शहा याने 1572 मध्ये बांधला असे मानतात.