मणिपूर राज्याची संपूर्ण माहिती Manipur Information In Marathi

Manipur Information In Marathi नमस्कार मित्रांनो ,आजच्या पोस्टमध्ये आपण मणिपूर या राज्याची माहिती पाहणार आहोत हे भारत देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे.‘रत्‍नभूमी’ (द लँड ऑफ ज्युवेल्स) असा या राज्याचा उल्लेख केला जातो. या राज्याचे क्षेत्रफळ २२,३५६ चौ. किमी. असून,लोकसंख्या २७,२१,७५६ एवढी आहे.

Manipur Information In Marathi

मणिपूर राज्याची संपूर्ण माहिती Manipur Information In Marathi

अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २३° ५०’ ते २५° ४१’ उ. अक्षांश व ९३° २’ ते ९४° ४७’ पू. रेखांश यांदरम्यान. मणिपूर राज्याच्या उत्तरेस नागालँड राज्य, पूर्व व आग्‍नेय दिशांना ब्रह्मदेश, दक्षिणेस मिझोराम हा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस आसाम राज्य असून इंफाळ ही राज्याची राजधानी आहे व देशातील सर्वात मोठे शहर आहे. मणिपुरी ही येथील प्रमुख भाषा असून तांदूळ, मोहरी व ऊस येथील प्रमुख पिके आहेत मणिपूरचा साक्षरता ७९.८५ % %आहे.

इतिहास

प्राचीन मणिपूरसंबंधी काही पुराणकथांतून माहिती मिळते. प्राचीनकाळी हा प्रदेश सागरमग्‍न होता परंतु अनेक देवदेवतांनी येथे मातीची भर घालून भूभाग निर्माण केला.

या भूमीवर शंकर – पार्वती क्रीडेसाठी अवतरले असताना नागराज अनंताने आपल्या मस्तकावरील मण्याने हा प्रदेश प्रकाशित केला, त्यामुळे या प्रदेशाला ‘मणिपूर’ हे नाव प्राप्त झाले, असे म्हटले जाते. मेकलाय, कासी, मकेली, मागली, मागलन इ. नावांनीही हा प्रदेश वेळोवेळी ओळखला जाई.

अर्जुनाची पत्‍नी चित्रांगदा ही येथील राजकन्या होय. तिचा पुत्र बभ्रुवाहन हा या प्रदेशाचा राजा झाला, अशी महाभारतात कथा आहे. काही अभ्यासकांच्या मते महाभारतातील ‘मणिपूर’ व सांप्रतचे आसामजवळील मणिपूर राज्य ही दोन्ही भिन्न असावीत.

आर्याच्या आगमनापूर्वी भारतात मणिपूरमध्ये एक स्वतंत्र व प्रगत राज्य नांदत होते, असे सांगितले जाते. त्यानंतर मात्र येथे आर्यांनी वस्ती केली, असे दिसून येते. तथापि इ. स. आठव्या शतकापर्यंतच्या येथील इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

त्यापुढील सतराव्या शतकापर्यंत येथील राजघराण्यात सु. ३६ राज्यकर्ते होऊन गेल्याचे सांगितले जाते. तेराव्या शतकात या प्रदेशावर चिनी आक्रमकांनी हल्ला केला होता परंतु त्यात त्यांचा पराभव होऊन अनेक चिनी आक्रमक पकडले गेले.

त्यांच्याकडूनच रेशीम उत्पादन व वस्त्रे विणण्याची तसेच विटांची घरे बांधण्याची कला येथील लोकांना अवगत झाल्याचे सांगितले जाते. पंधराव्या शतकातील राजा क्याम्बाच्या कारकीर्दीत श्रीचैतन्य प्रभूंच्या प्रभावामुळे या प्रदेशात वैष्णव धर्माचा प्रसार झाला.

मणिपूरच्या राजकीय इतिहासात पानहिबा या राजाची कारकीर्द (१७१४ ते सु. १७४९) महत्त्वाची ठरते. नाग कुळातील राजघराण्यातच त्याचा जन्म झाला. हा पितृवध करून राज्य घेईल, असे भविष्य लहानपणीच त्याच्या आईला ज्योतिषाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पानहिबाच्या आईने त्याला लहानपणीच एका नाग – सरदाराच्या ताब्यात दिले. मोठा झाल्यावर भविष्यवाणीप्रमाणेच त्याने वडिलांकडून मणिपूरची गादी बळकाविली.

तो अत्यंत पराक्रमी व गरिबांचा कैवारी होता ‘गरीबनवाज’ याच नावाने तो ओळखला जातो. त्याने हिंदू धर्म स्वीकारला, त्याचे अनुकरण करून मणिपूरमधील लोकांनीही हिंदू धर्माचा स्वीकार केला. या शतकापासूनच मणिपूरचा बराचसा सलग इतिहास मिळू शकतो.

भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात मणिपूरच्या शासनव्यवस्थेत क्रमशः बदल होत गेला. १५ ऑक्टोबर १९४९ रोजी विलीनीकरणाचा करार होऊन त्यानुसार केंद्र सरकारने येथील प्रशासन आपल्या हाती घेतली. मुख्य आयुक्त केंद्र सरकारच्या वतीने येथील प्रशासन चालवू लागला. १९५० – ५१ मध्ये येथे ‘सल्लागार शासन’ सुरू करण्यात आले.

१९५७ मध्ये ही शासनव्यवस्था बदलण्यात आली व तिच्या जागी ३० निर्वाचित व २ नियुक्त अशा ३२ सदस्यांची प्रादेशिक परिषद (टेरिटोरिअल कौन्सिल) काम पाहू लागली. पुढे १९६३ च्या केंद्रशासित प्रदेश अधिनियमान्वये मणिपूरमध्ये विधानसभा स्थापन करण्यात आली. तीत ३० निर्वाचित व ३ नियुक्त असे ३३ सदस्य होते.

राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन १६ ऑक्टोबर १९६९ मध्ये येथे राष्ट्रपती राजवट सुरू करण्यात आली. पुढे १९ डिसेंबर १९६९ पासून मुख्य आयुक्ताऐवजी लेफ्ट. गव्हर्नर हा येथील मुख्य प्रशासक म्हणून नेमण्यात येऊ लागला. २१ जानेवीरी १९७२ मध्ये मणिपूरला राज्याचा दर्जा देण्यात आला.

भूर्वर्णन

प्राकृतिक दृष्ट्या मणिपूरचे दोन विभाग पडतात : (१) राज्याच्या मध्यभागी असलेला मैदानी प्रदेश आणि (२) त्याच्या भोवतालचा पर्वतमय प्रदेश, मैदानी प्रदेश मणिपूर खोरे या नावाने ओळखला जात असून तो सस. पासून ७६२ मी. उंचीवर आहे. या प्रदेशाची लांबी ४० किमी., रूंदी सु. ४० किमी. व क्षेत्रफळ सु. १,५५५ चौ. किमी. आहे. राज्याचा सु. ९०% प्रदेश डोंगराळ असून येथील पर्वतरांगा उत्तर – दक्षिण दिशेत पसरलेल्या आहेत.

या पर्वतमय प्रदेशाच्या उत्तरेस नागा टेकड्या, पूर्वेकडील ब्रह्मदेशाच्या सरहद्दीदरम्यान मणिपूर टेकड्या व दक्षिणेस लुशाई व चीन टेकड्या आहेत. या प्रदेशाची सस. पासून उंची १,५२५ ते १,८३० मी. यांदरम्यान आढळते.

जास्तीतजास्त उंची ईशान्य भागात असून तेथे सस. पासून ३,९६२ मी. पेक्षा अधिक उंचीच्या टेकड्या आढळतात. उत्तरेकडे व दक्षिणेकडे ही उंची कमीकमी होत जाते. काही ठिकाणी शंक्वाकृती टेकड्या, तर काही ठिकाणी सपाट व उघडेबोडके कटक आढळतात.

आसाममधील काचार प्रदेशातून पूर्वेकडे मणिपूर खोऱ्याकडे जाताना मुख्य पाच डोंगररांगा पार कराव्या लागतात. या पर्वतरांगांच्या दरम्यान खोल अशी नद्यांची खोरी, निदऱ्या तसेच मोठमोठे कडे आढळतात. याशिवाय उत्तरेस चार, पूर्वेस पाच व दक्षिणेस एक अशा मुख्य पर्वतश्रेण्या आहेत.

मणिपूरला आठ महत्त्वाच्या मोठ्या नद्या आहेत. मणिपूर, इंफाळ, इरील, नामबुल, सेकमाइ, चाकपी, थौऊबाल आणि खुगा या त्या आठ नद्या असून या व्यतिरिक्‍त काही उपनद्याही आहेत.

मणिपूर राज्य भूकंपाच्या पट्ट्यात येत असल्यामुळे अधूनमधून भूकंपाचे धक्के बसतात. १८६९ व १८९७ मधील भूकंपांचे धक्के तीव्र स्वरूपाचे होते. मणिपूरमधील बहुतेक नद्या उत्तरेकडील व ईशान्येकडील पर्वतप्रदेशात उगम पावून दक्षिणेकडे वाहत येतात.

पावसाळ्यात त्या तुडुंब भरून व वेगाने वाहत असल्या, तरी आकाराने त्या फारशा मोठ्या नाहीत. इंफाळ, इरिल, थोबल, नंबुल व नंबोल या राज्यातील मुख्य नद्या आहेत. यांपैकी पहिल्या तीन नद्या उत्तरेकडील पर्वतीय भागात उगम पावून मध्यभागात असलेल्या लोकटाक सरोवराकडे वाहत जातात.

मात्र त्या सरोवराला मिळत नाहीत. नंबोल मात्र लोकटाक सरोवराला येऊन मिळते व तेथून ती कोर्टक नावाने बाहेर पडते. कोर्टकला इंफाळ व नंबुल नद्या येऊन मिळाल्यावर त्यांचा संयुक्त प्रवाह अचौबा, इंफाळ किंवा मणिपूर या नावांनी ओळखला जातो. हा प्रवाह प्रथम किंदत नदीला व पुढे चिंद्‌विन नदीला जाऊन मिळतो. यांशिवाय जिरी, माकरू, बराक, इरांग, लेंगबा इ. नद्या राज्यातून वाहतात.

पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशातील नद्या खडकाळ व खोल अशा निदऱ्यांतून वाहत असून त्या निदऱ्या बहुधा जंगलवेष्टित आहेत. बराक ही पर्वतीय प्रदेशातील सर्वात मोठी नदी आहे. मैदानी प्रदेशातील नद्यांमधून लहानलहान होड्यांद्वारे वाहतूक चालते. मणिपूर खोऱ्याच्या आग्‍नेय भागात लोकटाक हे राज्यातील सर्वात मोठे सरोवर आहे.

या सरोवराची लांबी १३ किमी. व रूंदी ८ किमी. असून क्षेत्रफळ पावसाळ्यात १०४ चौ. किमी. आणि कोरड्या मोसमात ६४ चौ. किमी. असते. याचे काठ दलदलयुक्त आहेत. पाण्याच्या पृष्ठभागावर अनेक पाणवनस्पती तरंगताना आढळतात.

सरोवरात काही बेटे असून त्यांवर मच्छिमारांची वस्ती आढळते. थांगा हे त्यांतील सर्वात मोठे बेट आहे. याशिवाय वैथाऊ, पमलेन, इकोक, लांफेल ही इतर सरोवरे होत. सर्वच सरोवरे मासेमारीच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

राजकीय

देशाच्या संसदेमध्ये या राज्यातून लोकसभेसाठी २ आणि राज्यसभेसाठी १ असे प्रतिनिधी निवडले जातात. राज्यात फेब्रुवारी १९८१ मध्ये राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आली होती.

प्रशासनाच्या सोयीसाठी उत्तर मणिपूर, पश्चिम मणिपूर, दक्षिण मणिपूर, पूर्व मणिपूर, मध्य मणिपूर व टेंगनौपल असे राज्याचे एकूण सहा जिल्हे करण्यात आले आहेत. आसाम राज्यातील गौहाती येथील उच्च न्यायालयाच्या कक्षेत हे राज्य मोडते.

लोकसंख्या

मणिपूर राज्याची लोकसंख्या 27,21,756 एवढी आहे.

लोक व समाजजीवन:

राज्यात ४० जमाती व उपजमाती आहेत. मणिपुरी लोक कमाल, लुआंग, मोइरंग व मेईथेई या चार जुन्या जमातींचे वंशज होत. आता ते मेईथेई या नावाने ओळखले जात असून इतरही काही जमाती त्यांतच मिसळल्या आहेत.

राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी दोनतृतीयांश लोक हिंदू धर्मीय असून ते प्रामुख्याने मणिपूर खोऱ्यात रहातात. ते विष्णुभक्त आहेत. ते स्वतःला हिंदू क्षत्रिय समजतात. मेईथेईशिवाय फुंगनाई जमातीचे लोक येथे असून त्यांच्या पाच उपजमाती आहेत. नागा व कुकी याही जमाती प्रमुख असून नागा जमाती सामान्यपणे उत्तर भागात, तर कुकी दक्षिण भागात आढळतात.

नागांमध्ये तंगखुल, काबुई, कोईराव, मारिंग या उपजमातींचा समावेश होतो. येथील लोइस ही कनिष्ठ दर्जाची जमात समजली जाते. राज्यातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ६४  असून स्त्री – पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण ९७२:१००० असे आहे.  समाजात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान आहे.

मणिपूर राज्यातील लोकसंख्येत सुमारे ५३% आहेत, त्यानंतर विविध नागा जमाती २४% आणि विविध कुकी-झो जमाती १६% आहेत.आदिवासींची लोकसंख्या राज्यातील लोकसंख्येच्या जवळजवळ ४१% आहे.हिंदू धर्म हा राज्यातील प्रमुख धर्म आहे, त्यानंतर ख्रिस्ती धर्म जवळपास आहे. इतर धर्मांमध्ये इस्लाम, सनामाही धर्म, बौद्ध धर्म,यहूदी धर्म(ज्यू धर्म) , इत्यादींचा समावेश आहे.

मृदा

सभोवतालच्या पर्वतमय प्रदेशातून वाहून आलेल्या गाळामुळे मणिपूर खोऱ्यातील मृदा गाळाची बनलेली आहे. उत्तरेकडील पर्वतमय प्रदेशात तृतीयक – पूर्व कालखंडातील स्लेट व वालुकाश्म आढळतात.

खनिजे

उच्च प्रतीच्या चुनखडीचे येथे भरपूर साठे असून ते राज्यातील प्रमुख खनिज आहे. यांशिवाय ॲस्बेस्टस, लिग्‍नाइट यांचे तसेच तांबे, निकेल यांच्या धातुकांचेही थोडेबहुत साठे आहेत.

शेती

शेती व वनोत्पादने ही राज्याची उत्पन्नाची मुख्य साधने होत. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. एकूण क्षेत्रफळापैकी २,१०,००० हेक्टर क्षेत्र शेतीखाली असून राज्याच्या एकूण उत्पादनापैकी ५१% उत्पादन शेतीव्यवसाय व पशुपालन यांपासून मिळते (१९७९ – ८०). शेतीच्या दृष्टीने मणिपूर खोरे महत्त्वाचे आहे.

या खोऱ्यातील मृदा गाळाची, तांबडी व पुरेशी खोलीची असून त्यात भाताचे पीक चांगले निघते. एकूण कृषि उत्पादनापैकी ८०% उत्पादन तांदळाचे असते. याशिवाय मोहरी, ऊस, विविध प्रकारची कडधान्ये, तंबाखू, खसखस, पालेभाज्या, गहू, ओट इ. पिकेही घेतली जातात. संत्री, लिंबू, अननस, केळी, फणस, सफरचंद, नासपती यांचेही उत्पादन घेतले जाते.

भूधारणाचे प्रमाण बरेच कमी असून सु. ३२% लोकांचे भूधारणाचे प्रमाण केवळ ०.५ ते १ हेक्टर यांदरम्यान आहे. पाचव्या पंचवार्षिक योजनेपासून जपानी भात शेतीपद्धतीचा अवलंब करण्यात येत असून दुहेरी पीकपद्धती, आधुनिक बी – बियाणे, खते इत्यादींचा वापर करण्यात येत आहे.

राज्यातील अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी १०५ छोट्या जलसिंचन योजना हाती घेण्यात आल्या आहेत. १९७७ – ७८ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन ३ कोटी ९४ लक्ष टन होते. डोंगराळ भागातील भटक्या जमाती सोपान व फिरती शेती करतात. या पद्धतीला ‘झूम’ असे म्हटले जाते.

हवामान

मणिपूर खोऱ्यातील हवामान थंड, आरोग्यवर्धक आहे. उन्हाळ्यातही रात्री व सकाळी हवा सामान्यपणे थंडच असते. मात्र पर्वतमय प्रदेशाइतके ते थंड नसते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु. २०० सेंमी. असून जास्तीतजास्त पर्जन्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो.

ईशान्य भागातील पर्वतीय प्रदेशातील हवामान थंड व काहीसे आर्द्र असते. हिवाळ्यात धुके व हिमतुषार आढळतात. इंफाळ येथील सरासरी पर्जन्य १७५ सेंमी. असून डोंगराळ प्रदेशात हेच प्रमाण २५० सेंमी. पर्यंत वाढलेले दिसते.

वनस्पती व प्राणी

राज्याचे ६८% क्षेत्र वनाच्छादित असून ते पर्वतीय भागात आढळते. पाइन, फर, ओक, बांबू, साग, सिंकोना, पाम हे येथील प्रमुख वृक्षप्रकार आहेत. जरदाळू, सफरचंद, नासपती, अलुबुखार ही फळझाडेही भरपूर आहेत. काही ठिकाणी चहाचे मळे आहेत. गवताची कुरणेही पुष्कळ आहेत.

मणिपूर खोऱ्यात मात्र विरळ वनश्री आढळते. जळाऊ व इमारती लाकूड हे जंगलातून मिळणारे प्रमुख उत्पादन असून बांबू, गवत, सुगंधी द्रव्ये, दालचिनी ही इतर उत्पादनेही मिळतात. १९८१ – ८२ मध्ये वनसंपत्तीपासून ३९ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मणिपूर मध्ये सामान्यपणे हत्ती, वाघ, गेंडा, अस्वल, हरिण, रानडुक्कर इ. वन्यप्राणी आढळतात. आग्‍नेयीकडील पर्वतरांगांमध्ये गेंडा व गवा, तर उंच पर्वतश्रेण्यांत अधूनमधून सिरो किंवा गोटअँटिलोप आढळतात.

रानडुक्कर, हरिण हे प्राणी मैदानी प्रदेशातही दिसून येतात. लोकटाक सरोवरात रानघोडे तसेच बदके आहेत. तितर, कृकणपक्षी व वन्यपक्षी सर्वत्रच आढळतात.

भाषा

राज्यात मणिपुरी ही मुख्य भाषा असून ती ६३.२४% लोक बोलतात. भारतातील ही एक प्राचीन भाषा समजली जाते. हिंदी भाषा हळूहळू सार्वत्रिक होत आहे. आदिवासी जमातींच्या स्वतंत्र बोली भाषा आहेत. मणिपुरी भाषा ही तिबेटो – ब्रम्‍ही भाषा समूहापैकी कुकि – चीन या समूहातील असून तिचे ब्रम्‍ही भाषेशी साम्य आहे.

एकेकाळी यांची स्वतंत्र लिपीही होती परंतु ती आता प्रचलित नाही. ही लिपी जाणणारेही आता फारच कमी लोक आहेत. मेईथेई लोकांनी वैष्णव पंथाचा स्वीकार केला, तेव्हापासून मणिपुरी बरोबरच बंगाली व आसामी भाषांच्या अभ्यासासही सुरुवात झाली आहे.राज्याची प्रमुख भाषा मणिपुरी असली तरी राज्यात काही घटक बोली बोलल्या जातात त्यांची भाषा व त्या कोण बोलतं ते पुढीलप्रमाणे :

अैमोल – अैमोल; आनल – आनल; चिरू – चिरू; चोटे – चोटे; गांगटे – गांगटे; हमार – हमार; काबुई – नागा-काबुई; कोझिंग – कोझिंग; कोम – कोम; लम्गाँग – लम्गाँग; माओ – नागा माओ; मराम – कोईरावो, नागा-मराम; मारिग – नागा- मारिग; मोन्साग – मोन्साग; मोयोन – मोयोन; पाइटे – मिझो- पाइटे; तांग्खूल – नागा- तांग्खूल; वाइफेई – वाइफेई; थाडो – थाडो; झोऊ – झोऊ.

सन आणि उत्सव

लाई- हरोबा रास लिला, चैराओबा, निंगोल, चकीबा, रथजत्रा-ईद-उल-फित्र, गानगाय, लुईगाईनी, ईद-उल-जुहा, यायोसंग (होली), दुर्गापूजा, मेरा हौचौगंबा, दिवाळी, कुट, चुंफा, चेइराओबा, कांग आणि हेइक्रु हीडोंगबा, ख्रिसमस इत्यादी सण व उत्सव मणिपूर मध्ये उत्साहात साजरे केले जातात.

रास लिला, थांग टा, ढोल चोलोम, खांबा थोइबी नृत्य, मैबी नृत्य, नुपा पाला आदि लोकनृत्य मणिपूर मध्ये विविध आदिवासींकडून सादर केले जातात.

पोशाख

मणिपुरी पुरुष सहसा पांढरा कुर्ता आणि धोतर घालतात. त्यांचे धोतर नेहमीच्या बंगाली धोतरावरून प्रेरित आहे. विशेष प्रसंगी, ज्यांना थोडी जास्त मागणी असते, ती पांढरी पगरी किंवा पगडी नेसली जाते.आपण स्त्रियांच्या पोशाखाबद्दल बोललो तर स्त्रिया एक विशिष्ट प्रकारचे कपडे घालतात ज्याला इन्नाफी म्हणतात.

इनाफी, थोडक्यात, तुमच्या वरच्या शरीराभोवती गुंडाळण्यासाठी एक कापड आहे, बहुतेक शालसारखे. ज्वलंत रंग आणि ठळक आकृतिबंध असलेल्या पारंपारिक कापडांच्या विरूद्ध, मणिपुरी विणकर मऊ पेस्टल रंगांचा वापर करतात .

मणिपुरी पोशाख, फणेक हे सारंग किंवा लपेटलेल्या स्कर्टसारखेच असते. परंतु बर्‍याच नियमित सारोंगच्या विपरीत, ते अर्ध-पारदर्शक नसते. कापूस, रेशीम आणि इतर सिंथेटिक कापडांचा वापर करून फानेक्स हाताने विणलेल्या लूमवर विणले जातात. ते सहसा ब्लॉक मुद्रित असतात आणि बहुतेक सपाट रंग किंवा पट्ट्यांमध्ये आढळतात.

आहार

मणिपूरच्या स्थानिक खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने भात आणि मासे प्रसिद्ध आहेत.  मणिपूरच्या लोकांना फिश करी आवडते जी नागा थोंगबा म्हणून ओळखली जाते.

शाकाहारी अन्न म्हणून, मणिपूरमध्ये प्रसिद्ध उटी अन्न आहे.  मणिपूरचा सर्वात खास पदार्थ म्हणजे भाज्यांनी बनवलेले चामथॉंग. मणिपुरी लोकांना तेल न वापरता केलेले अन्न जास्त आवडते तसेच त्यांना चायनीज हे पण खूप आवडते.

उद्योगधंदे

लोइटांग खुनाऊ येथे एक सूत गिरणी आहे. चुनखडीच्या साठ्यांचा विचार करून प्रत्येक जिल्ह्यात एकेक छोटा सिमेंट कारखाना उभारण्याची योजना आहे. याशिवाय कागद, स्टार्च, ग्‍लुकोज, मक्याचे पोहे (कॉर्नफ्लेक्‍स) इत्यादीच्या उत्पादनाचे कारखाने सुरू करण्याच्या योजना आहेत.

हातमाग उद्योग हा राज्यातील महत्त्वाचा उद्योग असून तो प्रामुख्याने घरगुती स्वरूपाचा आहे. हातमागावर विविध प्रकारच्या व रंगांच्या कापडाचे उत्पादन काढले जात असून त्याला स्थानिक तसेच परदेशांतूनही मागणी येते.

येथील हातमाग उद्योगाच्या विकासासाठी ‘मणिपूर हँडलूम अँण्ड हँडिक्राफ्ट्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडूनही या उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे.

लघुउद्योगात सुतारकाम, लोहारकाम, चर्मोद्योग, भरतकाम, विटा बनविणे, शिवणकाम, सोनार काम, वाहनांची दुरूस्ती व संधारण, कथिलकाम या उद्योगांचा समावेश होतो. लघुउद्योगांना कच्चा माल पुरविणे व पक्क्या मालाची विक्रीव्यवस्था करणे, ही कामे मणिपूर लघुउद्योग महामंडळातर्फे पार पाडली जातात.ताक्येलपत व इंफाळ येथे औद्योगिक वसाहती आहेत.

काही प्रमाणात मातीची, धातूची व तांब्याची भांडी तयार केली जातात. परंतु मागणीच्या मानाने त्यांचे उत्पादन कमी असल्याने इतर राज्यांतून त्यांची आयात केली जाते. सुतारकाम, लाकडावरील कोरीवकाम यांत येथील लोक प्रवीण आहेत.

इंफाळ हे राज्यातील बाजारपेठेचे मुख्य केंद्र असून रेशमी व सुती कापड, मासे, पालेभाज्या, तांदूळ, चटया यांचा येथे मोठा व्यापार चालतो. व्यापारात प्रामुख्याने मणिपुरी स्त्रिया अधिक असून त्याच खरेदीविक्रीचे व्यवहार करतात. राज्याबाहेरील व्यापार नागालँड, आसाम व काही प्रमाणात ब्रम्‍हदेशाशी चालतो. तांदूळ, वनोत्पादने, गाई, बैल, म्हशी यांची निर्यात व तेल, सुपारी, सुकविलेले मासे, मीठ, कापडी वस्तू, सूत यांची आयात केली जाते.

प्रेक्षणीय स्थळे

मणिपूर हे एक निसर्गसुंदर असून अनेकदा त्याची तुलना स्वित्झर्लंडशी केली जाते. मणिपूर खोऱ्याच्या मध्यभागात वसलेले इंफाळ हे राजधानीचे शहर सांस्कृतिक, व्यापारी व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथील बाजारपेठ, पोलो मैदान, वस्तुसंग्रहालय, राजवाडा, सुवर्ण मंदिर, नृत्य अकादमी इ. उल्लेखनीय आहेत.

इंफाळच्या पश्चिमेस ६ किमी. वरील प्रसिद्ध प्राणिसंग्रहोद्यान, उत्तरेस ७ किमी. वरील खोंघांपत ऑर्किड यार्ड, ८ किमी. वरील लांगथाबल, १६ किमी. वरील वैथाऊ व २७ किमी. वरील बिशनपूर ही निसर्गरम्य ठिकाणे, २९ किमी. वरील कैना (हिंदूचे पवित्र स्थान), ३७ किमी. वरील खोंगजोम (ऐतिहासिक ठिकाण) इ. स्थळे प्रेक्षणीय आहेत. इंफाळपासून ४५ किमी. वरील मोइरंग हे प्राचीन सांस्कृतिक केंद्र असून खंबा – थोइबी नृत्याचे हे उगमस्थान मानले जाते.

दुसऱ्या महायुद्धकाळात काही काळ आझाद हिंद फौजेचे ते मुख्य केंद्र होते. मोरेह हे ब्रह्मदेश सहहद्दीजवळील एक मोक्याचे ठिकाण आहे. याशिवाय चूरचंदपूर, माओ, टेंगनौपल, उखरूल, कांगचूप, पल्लेल, कौब्रू ही पर्यटनकेंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच लोकटाक सरोवर, याच सरोवरतील थांगा व करांग बेटांवरील सुंदर उद्याने आणि लोकटाक जलविद्युत् प्रकल्प ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment